क्राईम जगत
“ऑन ड्यूटी” पोलिसाचा खून! घराशेजारीच गाडला मृतदेह
खुनाला अनैतिक संबंधाची किनार?; तीन संशयित ताब्यात

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी) : देवगाव रंगारी (ता. कन्नड) पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस अंमलदारांची त्यांच्या मूळ गावी निर्घण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना ४ जानेवारीच्या सायंकाळी उघडकीस आली. खुनानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह घराशेजारीच पुरला. प्रकरणी शिऊर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून सदर प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलीस अंमलदार नानासाहेब दिवेकर हे १ जानेवारी रोजी आपल्या वृद्ध वडिलांना भेटण्यासाठी मूळ गावी बळ्हेगाव (ता. वैजापूर) येथे गेले होते. २ जानेवारीच्या सकाळपर्यंत ते सर्वांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचा फोन बंद झाला. नानासाहेब पोलीस स्टेशनलाही गैरहजर आणि कुटुंबीयांशीही संपर्क तुटल्याने मुलाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावच्या सरपंचांना फोन केल्यानंतर मुलाचा संशय बळावला. शिऊर पोलिसांनीही तपासला गती देत बळ्हेगाव येथील त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील पलंगाखाली नानासाहेबांचा मोबाइल ‘फ्लाईट मोड’वर आढळून आला. तसेच घराच्या शेजारच्या मोकळ्या जागेत पोलिसांना माती उकरलेली दिसली. त्यामुळे पोलिसांनी सदर ठिकाणी खोदकाम केले असता, जमिनीत नानासाहेबांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत मिळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शिऊर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तीन संशयितांची ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस अंमलदार नानासाहेब हे पडेगाव (छत्रपती संभाजीनगर) येथून दररोज ये-जा करायचे. त्यांची पत्नी गेल्या तीन वर्षांपासून माहेरी राहत असून मुलगा धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे.



