
बुलढाणा,(प्रतिनिधी) : जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला कामाचा डोलारा आणि जनसंपर्कासाठी शासनाकडून वाहन देण्यात आलेले वाहन जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या ‘अजब’ कारभारामुळे पंधरा दिवस एकच जागेवर धूळखात उभे होते. या संदर्भात “हिंदवार्ता” वृत्त प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर वृत्त गांभीर्याने घेत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाची झाडाझडती घेत चांगलीच कान उघडणी केली. त्यामुळे इंधनचे कारण पुढे करून एका जागी उभे केलेले “ते” वाहन पुन्हा रस्त्यावर धावताना दिसून आले.
जिल्हा माहिती कार्यालयांना त्यांच्या वाहनाचा इंधन आणि वंगण खर्च हा संबंधित शासनाकडून देण्यात येतो. तांत्रिक कारणास्तव हेडमध्ये अनुदान न आल्यास जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी स्वतः इंधनाचा खर्च करून नंतर त्याचे देयक लेखा शाखेकडे सादर करण्याची जुनीच परंपरा आहे. यापूर्वीचे अधिकारी याच पद्धतीने जिल्ह्याचा दौरा आणि शासकीय कामे करत असत. मात्र, विद्यमान जिल्हा माहिती अधिकारी याला अपवाद ठरले होते. इंधन भरण्याची तयारी नसल्याने त्यांनी थेट शासनाचे वाहनच ‘गॅरेज’ केल्याचा प्रताप केला होता. यामुळे शासनाच्या योजनांच्या प्रचाराला खीळ बसत असून वाहन दीर्घकाळ एकाच जागी उभे राहिल्याने बॅटरी उतरणे, टायर खराब होणे यांसारख्या तांत्रिक समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असल्याची असू आर्थिक नुकसान असल्याचे वृत्त “हिंदवार्ता”ने प्रकाशीत केले होते. सदर वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने वाहनाची साफसफाई करून त्यामध्ये इंधन टाकल्याने या शासकीय वाहनाची थांबलेली ‘चाके’ पुन्हा फिरताना दिसून आली.
माझ्यासाठी एवढी बातमी छापा?
दरम्यान, वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यांनी शहरातील काही पत्रकारांना फोन केला. “जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने शासकीय वाहन वापराबाबत नवा पायंडा पाडला आहे. अनेक अधिकारी फक्त मिरवण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र जिल्हा माहिती अधिकारी यात अपवाद ठरले आहे. इंधन अनुदानाची उपलब्धता आणि वाहन सुस्थितीत असतानाही प्रशासकीय काटकसर, साधेपणा आणि आर्थिक शिस्त या दृष्टिकोनातून जिल्हा माहिती अधिकारी यांनी सरकारी लवाजमा न करता ते साध्या दुचाकीने शासकीय बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहून कामकाज करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.”, या आशयाची दिशाभूल करणारी माहिती पत्रकारांच्या “व्हॉट्सॲप”वर पाठवली. माझ्यासाठी एव्हढी बातमी प्रकाशित करा, अशी विनवणी करून सदर बातमी प्रकाशित करुन घेतल्याची चर्चा आहे. त्यांची ही खटाटोप म्हणजे कसुरीवर पडदा टाकून स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रकार असल्याचेही बोलल्या जात आहे.
केवळ पंधरा दिवसांची तर शिस्त नव्हती?
ऑक्टोबर २०२४ मध्ये विद्यमान जिल्हा माहिती अधिकारी यांनी बुलढाणा जिल्हा प्रभारी माहिती अधिकारी म्हणून पदभार घेतला. तेव्हापासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाहनाचे इंधन, देखभाल दुरुस्तीवर केलेला खर्च अनावश्यक का वाटला नाही?, “गरज नसताना अनावश्यक खर्च करणे टाळणे” ही भूमिका यापूर्वी का घेता आली नाही?, यामागे आर्थिक शिस्त आणि भविष्यातील लेखापरीक्षणातील आक्षेप टाळण्याचा प्रयत्न होता तर, “हिंदवार्ता” वृत्त प्रकाशित होताच वाहन पूर्ववत सुरू करून अनावश्यक खर्च करण्याचे कारण काय?, आर्थिक शिस्त लावण्याचा उद्देश केवळ पंधरा दिवसांसाठीच होता का?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.



