‘त्या’ ऑटोलकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवला मर्ग!
गळ्यावरील जखमांमुळे हत्येची शंका कायम

मलकापूर,(प्रतिनिधी): तालसवाडा-शिवनी रोडवर झालेल्या अमोल भाऊराव भवरे (वय ३५ वर्षे) रा. धरणगाव या तरुणाच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मलकापूर पोलिसांनी सध्या मर्ग दाखल केला असला, तरी मृतदेहावरील संशयास्पद जखमांमुळे घातपाताची शक्यता कायम आहे.
धरणगाव येथील रहिवासी असलेला अमोल भवरे (वय ३५ वर्षे) हा ऑटो चालक आहे. आज ८ जानेवारीच्या सकाळी त्याच्या मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी दसरखेड एमआयडिसी पोलिसांनी विजय प्रभाकर भवरे यांनी दिलेल्या खबरीवरून मर्ग दाखल केला आहे. पोलिसांच्या अभिलेखावर आकस्मिक मृत्यूची नोंद असली, तरी घटनेची परिस्थिती खुनाकडे इशारा करत असल्याचे बोलल्या जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्याप्रमाणे मृतक अमोल भवरे याच्या शरीराची पाहणी केली असता, त्याच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमा पाहता त्या अपघाती मृत्यूच्या दाव्याला छेद देत आहेत. अमोलच्या गळ्यावर दोरीचा व्रण दिसून आला. तसेच त्याचा एक हात फॅक्चर असल्याचे दिसून आल्याचे मृतदेह पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे.
मृतदेह आढळलेल्या स्थितीवरुन सदर प्रकार केवळ अपघात नसून घातपाताचा बनाव असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांनी अमोलच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय व्यक्त केला नसला तरी, पोलिसांचा तपास आणि शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अमोलचा ‘अपघात झाला की, घातपात’?, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. नव्हेतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालावरच खुनाचा गुन्हा दाखल करायचा की नाही?, हे अवलंबून आहे. दरम्यान, ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली, तरी खुनाची व्यक्त करण्यात आलेली शंका पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी आहे.



