स्मार्ट बुलढाणा

धाडची अंगणवाडी की, कोंडवाडा?

चिमुकल्यांची दमकोंडी; शासन,प्रशासनाचा निष्काळजीपणा

अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी) : धाडनगरीतील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये असलेली अंगणवाडीची इमारत मोडकळीस आलेली आहे. या इमारतीची नव्याने बांधणी किंवा दुरुस्ती करणे अभिप्रेत असताना संबंधित विभागाने दोन हजार रुपये महिन्याने तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीसाठी एक गाळा उपलब्ध करून दिला. मात्र, हा गळा अत्यंत छोटा असल्याने चिमुकल्यांची दमकोंडी होत असल्याचे चित्र आहे.
भारत सरकारच्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा’ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्या कल्याणासाठी अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येते. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे, कुपोषणाची समस्या दूर करणे,हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र,या ठिकाणी या उद्देशाला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सुरू असलेली अंगणवाडी एका छोट्याशा आणि अरुंद खोलीत सुरू असल्यामुळे मुलांची या ठिकाणी दमकोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. खेळ, अभ्यास तसेच पोषण आहारासाठी आवश्यक मोकळी जागा याठिकाणी बालकांच्या सुरक्षिततेचा खेळ होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
एकेकाळी प्रशासनाकडून मोडकळीस आलेल्या मूळ अंगणवाडी इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारणीचे घोडे अडले कुठे?, हे आजवरही कोणाला सांगता आले नाही. वारंवार निवेदने व तक्रारी करूनही प्रशासन केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडत असल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे.
आमच्या मुलांचे आरोग्य व शिक्षण दोन्हीही धोक्यात आले आहे. शासन जाणून बुजून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. अंगणवाडी सुरू असलेला गाळा इतका छोट्या आहे, की त्यात सामान ठेवण्यास देखील जागा नाही. अशा ठिकाणी जर आमच्या बालकांना बसावे लागत असल्याने त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष लक्ष देऊन आपल्यात संवेदनशीलता शिल्लक असल्याची जाण नागरिकांना करून देण्याची गरज आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!