बुलढाणा,(प्रतिनिधी) : स्वामी विवेकांनद जन्मोत्सवाचा तो दिवस….अर्थात १० जानेवारीची ती दुपार…अंचरवाडी फाट्यावरील फॉरेस्टचा तो निर्जन भाग नेहमीप्रमाणे शांत होता. सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली असतांना केवळ पालापाचोळा उडण्याचा आवाज, तर कधी पक्षांची किलबिलाट कानावर पडत होती. मानवी वावर तसा या ठिकाणी कमीच असतो. मात्र, या फॉरेस्टमध्ये गुरे चारणाऱ्या एका गुराख्याला दुपारच्या सुमारास झुडपांच्या पल्ल्याड काळसर काहीतरी पडलेलं दिसलं. कोणीतरी कचरा जाळला असेल, असे म्हणत सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या गुराख्याच्या ‘त्या’ सांगाड्याजवळ जाताच काळजाचा ठोका चुकला. त्याने समोर पाहीलेलं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. कारण एका अज्ञात रहस्यमय गोष्टीची राख त्या ठिकाणी पडली होती.
घाबरलेला गुराखी जीव मुठीत घेऊन सदर ठिकाणावरुन पळत सुटला. गुराख्याने बघितलेल्या रहस्यमय गोष्टीची चर्चा गावात तेसच पोलिसांच्या कानावर वाऱ्याच्या वेगाने जाऊन धडकली. क्षणाचाही विलंब न करता अंढेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. खडकाळ भाग असलेल्या उपरोक्त ठिकाणी लवकर कोणी जात नाही, अशा ठिकाणी पोलिसांनी जे काही पाहीलं, ते पाहताच आपली तपासचक्रे गतीमान केली. एक पूर्णत: काळं पडलेलं शरीर… मणुष्याचं नाहीतर, तर यंत्राचं होतं! एक मोटारसायकल या ठिकाणी पूर्णत: कोळसा झालेल्या स्थितीत पडून होती. पण, मोटारसायकलला लागलेली ही आग साधी नव्हती, तर ज्या निर्जन ठिकाणी ती गाडी जळून पडलेली होती, त्यावरून हा काहीतरी मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे अंढेरा पोलिसांनी राखेच्या ढिगाऱ्याची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये पोलिसांना जाणीवपूर्वक तुकडे करण्यात आलेल्या गाडीच्या नंंबरप्लेटचे तुकडे मिळून आले. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने केलला हा प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला आणि खरा तपासाचा थरार येथून सुरू झाला.
पोलिसांनी राखेच्या ढिगाऱ्यात मिळून आलेल्या तुकड्यांची जोडजाड केली. गाडीचा इंजिन, चेसिस क्रमांक शोधून काढला. एवढ्यावरच न थांबता तांत्रिक विश्लेषकांच्या मदतीने मूळ माहिती काढण्याचा परुत्न केला. मात्र, ढिगाऱ्यात मिळून आलेल्या नंबर प्लेटच्या तुकड्यांवरील नंबरमध्ये आणि गाडीचा मूळ नंबरमध्ये तफावत आढळून आल्याने तपासपथकही चक्रावून गेले. राख झालेल्या दुचाकीचा मूळ क्रमांक एमएच-२८-एजी-४९६२ असून सदर गाडी हिरो पॅशन प्रो कंपनीची असल्याची बाब समोर आली. तसेच गाडीचे मालक शेंदूरजन (ता.सिंदखेड राजा) येथील रमेश तुकाराम नागरे असल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे घटनास्थळी सापडलेली नंबर प्लेट बनावट असून पोलिसांची दिशाभूल करुन गुन्हा लपविण्यासाठी पुरावा नष्ट करण्याचा हा प्रकार असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. माणवी वस्तीपासून कोसोदूर जंगलात मिळालेली ‘ती’ केवळ जळालेली दुचाकी नव्हती, तर गंभीर गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तपासपथकाने राखेच्या ढिगाऱ्यातील नंबर प्लेटचे तुकडे जुळविल्याने ‘त्या’ सांगाड्याची ओळख पटली!
अंढेरा पोलिसांना पेलावे लागणार आव्हान!
मोटारसायकल निर्जनस्थळी पोहोचली कशी? एखाद्या गंभीर गुन्ह्यात सदर दुचाकीचा वापर झाला का?, गाडीला बनावट नंबर प्लेट लावण्याचे कारण का?, या मागील सुत्रधार नेमका कोण आहे?, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. सोबतच ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासण्यासह मूळ मालकाचा देखील शोध घेण्यात येत आहे. फॉरेस्टच्या स्मशान शांततेत दडून बसलेली ‘ब्लॅक’ हिस्ट्रीचा उलगडा करण्याचे आव्हान आता अंढेरा पोलिसांसमोर उभे ठाकले असून ते कसे पेलतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.