विद्यार्थ्यांनी समजून घेतला पोलीस स्टेशन, तहसिल व पोस्टाचा कारभार
वडगाव जिल्हा परिषद शाळेचा अभ्यास दौरा

मोताळा,(प्रतिनिधी): तालुक्यातील वडगाव(खं) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात चालणाऱ्या दैनंदिन कामकाजाची माहिती व्हावी यासाठी ९ जानेवारी रोजी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यानी बोराखेडी पोस्टे., मोताळा पोस्ट ऑफीस व तहसिल कार्यालयाचा कारभार समजून घेतला.
विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसिल कार्यालय, पोस्ट ऑफीस तसेच तहसिल प्रशासनाचा कारभार कसा चालतो, याचे ज्ञान मिळावे यासाठी वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्याम लांडे याच्या संकल्पनेतून अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्याध्यापक लांडे व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ९ जानेवारी रोजी मोताळा येथे आणण्यात आले.
यावेळी शिस्तबध्द पध्दतीने विद्यार्थ्यांनी मोताळा तहसिल कार्यालयात भेट दिली. यावेळी नायब तहसिलदार यांनी विद्यार्थ्यांना तहसिल कार्यालयात प्रत्येक टेबलवर चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. सातबारा, जात प्रमाणपत्र, कोटरबुक नक्कल तसेच दुय्यम निबंधक कार्यालय,भूमिअभिलेख संपूर्ण माहीती देत सेतूचे कार्य समजावून सांगितले. तर विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसाविषयी भिती कमी करुन पोलिस नागरिकांचे कशाप्रकारे संरक्षण करतात. यासाठी बोराखेडी पोलिस स्टेशन येथे भेट दिली. यावेळी ठाणेदार सिताराम मेहत्रे व एपीआय बालाजी शेगेंपल्लू, पीएसआय. राजेंद्र कपले यांनी विद्यार्थ्यांना रायफल, पिस्टलचे प्रात्यक्षीक करुन दाखवित त्यांची भिती कमी करीत पिस्टल प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात दिले.
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी गुन्हा नको प्रेम द्यावे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी पंचायत समिती व पोस्ट ऑफीस कार्यालयाला भेट देवून पोस्टातील दैनंदिन व्यवहाराची माहिती समजावून सांगितली. पंचायत समिती कार्यालयात शिक्षण विभाग,बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,समाजकल्याण विभाग यांची माहीती गटविकास अधिकारी अशोक काळे व गटशिक्षण अधिकारी मनोहर धंदर यांनी समजावून सांगितली. मुख्याध्यापक श्याम लांडे यांनी आयोजीत केलेला हा जिल्ह्यातील पहिलाचा उपक्रम असून त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.



