दणका ‘हिंदवार्ता’चा : ‘अमोल’च्या हत्याकांडात अनैतिक संबंधांचा अँगल ठरला खरा!
दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीसही ठोकल्या बेड्या!

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): धरणगावचा रिक्षाचालक अमोल भाऊराव भवरे यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले आहे. ‘हिंदवार्ता’ने आपल्या पहिल्याच वृत्तात वर्तवलेला ‘अमोल’च्या खुनाचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला आहे. अपघाती मृत्यू किंवा आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेला बेनकाब करण्यात ‘हिंदवार्ता’च्या अभ्यासपूर्ण शोध बातमीचा सिंहाचा वाटा राहीला आहे. दसरखेड एमआयडिसी पोलिसांनी आता सदर हत्याकांडात दुसऱ्या आरोपीलाही बेड्या ठोकल्या असून या खुनाला अनैतिक संबंधांची किनार असल्याचे समोर आले आहे.

शिवनी ते तालसवाडा जाणाऱ्या रस्त्यावर ८ जानेवारीच्या सकाळी अमोल भाऊराव भवरे या ऑटोचालका मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मृतकाच्या भावाच्या फिर्यादीवरुन दसरखेड एमआयडिसी पोलिसांनी या प्रकरणात मर्ग दाखल केला होता. मात्र, ‘हिंदवार्ता’ने प्रकाशीत केलेल्या आपल्या बातमीतून अमोलचा घातपात झाल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मृतक अमोलच्या गळ्यावर असलेले दोरीचे व्रण, त्याचा फ्रॅक्चर झालेला हात आणि घटनास्थळावरील संशयास्पद स्थिती बघुन अमोलचा खून झाल्याचा दावा केला होता. अखेर मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी यामध्ये कलम १०३ (१), २३८ (ब) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासचक्रे गतीमान केली होती.
दसरखेड एमआयडिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त प्रकरणात तांत्रिक माहिती काढली. गुप्त बातमीदारांकडून खबर घेऊन सुक्ष्म तपास केला. एका संशयीतासह मृतक अमोलच्या पत्नीची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली असून मृतक अमोल भवरे याच्या नात्यातील एका महिलेसोबत आज १२ जानेवारी रोजी अटक करण्यात आलेल्या दुसरा आरोपी नामदेव रमेश तायडे (वय ३७ वर्षे) रा. शिवनी याचे अनैतिक संबंध असून अमोल संबंधाच्या आड येत असल्यानेच त्याचा ‘गेम’ करण्याचे षडयंत्र रचून त्याची हत्या करण्यात आली. तसेच ७ जानेवारी रोजी अमोलचा फोनवरील वाद, करण्यात आलेली हत्या म्हणजे पूर्वनियोजित कटाचाच भाग असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुन्हा एकवार ‘हिंदवार्ता’ची विश्वासार्हता सिद्ध
अमोल भवरे हत्याकांडाच्या संपूर्ण प्रकरणावर सुरुवातीपासूनच ‘हिंदवार्ता’चे प्रस्तुत प्रतिनिधी बारकाईने लक्ष ठेवून होते. मृतक अमोलच्या कुटुंबीयांनी ‘आमचा कोणावरही संशय नाही’, असे सांगितल्यानंतरही ‘हिंदवार्ता’ने केवळ परिस्थितीजन्य पुरावे आणि अभ्यासाच्या जोरावर अमोलचा खून करण्यात आल्याचे ठामपणे आपल्या वृत्तातून सांगितले होते. दरम्यान, आज १२ जानेवरी रोजी दसरखेड एमआयडिसी पोलिसांनी गुन्ह्यातील दुसरा आरोपी आरोपी नामदेव रमेश तायडे याला अटक केली असून आरोपी व अमोलच्या पत्नीच्या जबाबावरुन त्याच्या खुनाला अनैतिक संबंधांची किनार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे, हे विशेष!
ठाणेदार पेंदोर यांचे बुध्दीचातुर्य
ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनात दसरखेड एमआयडिसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या गंभीर व किचकट गुन्ह्याचा उलगडा केला. पेंदोर यांनी आपले बुध्दीचातुर्यातून संशयास्पद हालचाली टिपल्या. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारवर तपास पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.



