स्मार्ट बुलढाणा

जिजाऊंच्या जन्मस्थळी उलटला लाखो शिवभक्तांचा जनसागर

सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२८ वा जन्मोत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजानगरीत १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. सूर्योदयापासूनच जिजाऊभक्त व शिवप्रेमींचा मोठा जनसागर दर्शनासाठी उलटल्याचे पहावयास मिळाले.

जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जिजाऊ भक्तांनी तसेच शिवप्रेमींनी ठिकठिकाणी तोरण, पताके लावून जन्मोत्सवाची अभूतपूर्व तयारी केली होती. राजे लखुजीराव जाधवराव, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रितरित्या रेखाटण्यात आलेली भव्य रांगोळी लक्षवेधक होती. दरवर्षीप्रमाणे मराठा सेवा संघातर्फे आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यामध्ये शिवधर्म पीठावरील मुख्य कार्यक्रमात राजे लखुजीराव जाधवराव यांचे वंशज राजे विजयसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जिजाऊ माँ साहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र तसेच देशभरातील इतर भागातून जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

सकाळी ६ वाजता राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी त्यांचे वंशज राजे शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते विधिवत महापूजा पार पडली. त्यानंतर केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची महापूजा करून त्यांना अभिवादन केले. यावेळी आ. मनोज कायंदे, डॉ. राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जयश्री शेळके, डॉ. सुनील कायंदे, आतिष तायडे, ॲड. संदीप मोहत्रे, समाधान शिंगणे यांनी देखील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जिजाऊ भक्त व शिवभक्तांनी राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा अक्षरश: गर्दीने फुलून गेला. तर जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, अशा गगनभेदी घोषणा कानावर पडत होत्या. अनेक जिजाऊ भक्तांनी आपल्या पाल्यांना माँ साहेब जिजाऊ व बाल शिवबा यांची वेशभूषा घालून याठिकाणी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वंशजांकडून मानाचे पूजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांनी त्यांना अभिवादन केले. राजेजाधव परिवाराच्या वतीने राजवाड्यामध्ये राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतीकात्मक पाळणा ठेवण्यात आला व त्या ठिकाणी उपस्थित वंशजांनी अंगाई गीते गाऊन मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा केला.

राजे लखुजीराव जाधव यांचे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा शाखेचे वंशज, देऊळगाव राजा येथील बालाजी संस्थानचे वंशपरंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब छायाराजे विजयसिंह जाधव, युवराज्ञी मृणाल यांच्या हस्ते व इतर वंशजांच्या उपस्थितीत सकाळी ५.४५ मिनिटांनी राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळावरील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच आरती ओवाळून सहपरिवार पूजा करण्यात आली. या मानाच्या पूजेसाठी जवळखेड, उमरद, मेहुणाराजा, आडगावराजा, किनगावराजा येथील सर्व वंशजांची उपस्थिती होती. त्यांनी माँ जिजाऊंचे विधिवत पूजन करून अभिवादन केले. तसेच राजे लखुजीराव जाधव यांच्या राजदरबारामधील प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

सूर्योदयसमयी मानवंदना

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त मातुतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थळी लखुजी राजे जाधव यांच्या वंशजांच्या वतीने मानाचे जिजाऊ पूजन झाले. सनई चौघड्यांच्या निनादात, जय जिजाऊ जय शिवरायांच्या जयघोष आणि आतषबाजी करीत हा उत्सव पार पडला. राष्ट्रमाता जिजाऊंचे पिताश्री क्षात्रतेजसंपन्न लखुजीराजे जाधव वंशजांच्या वतीने याही वेळेस पहाटे सूर्योदयसमयी ५ वाजून ४५ मिनिटांनी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिन सोहळा उत्साहात पार पडला. प्रा. गोपाल राजे यांच्या वतीने भगवतगीतेच्या १५ व्या अध्यायाचे पठण करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच आरती करून लखुजीराजेंच्या राजवाड्यातील बालशिवासह असलेल्या धवल मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी सुभाष राजे, वंदना राजे, आनंद राजे, नीता राजे, अभय राजे, कल्याणी राजे, मार्तंड राजे, विजयसिंह राजे, चंद्रकांत राजे, राज राजे घनसावंगीकर या वंशजांनी जिजाऊंना मानवंदना अर्पण केली. दरम्यान, किनगाव राजा येथील लखुजीराजे जाधवांच्या वंशजांच्या वतीने गत वर्षापासून जिजाऊंचा पाळणा सोहळा सुरू करण्यात आला आहे. जन्मस्थळी जिजाऊंच्या पूजनानंतर हा पाळणा सोहळा झाला. फुलांनी सुशोभित केलेल्या आकर्षक कोरीव सागवानी पाळण्यामध्ये बालजिजाऊंची प्रतिमा ठेवून उपस्थित महिलांच्या वतीने जिजाऊंच्या नाममहिमाचे वर्णन करणारे पाळणे गाऊन पाळणा जोजवण्यात आला. यावेळी राधिका राजे, जिविका राजे, प्रांजल राजे, वसुधा राजे या बालिकांनी पाळण्याभोवती फेर धरून नृत्य करीत जन्मोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनीही पाळणा सोहळ्यास भेट देऊन बाल जिजाऊंचे दर्शन घेतले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!