खामगावात ईश्वर चिठ्ठीमध्येही भाजपाचेच ‘लक’!

खामगाव,(प्रतिनिधी):नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतोष पुरोहित विजयी झाले. तर चारही स्वीकृत नगरसेवकांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. प्रमोद अग्रवाल, रमेश भट्टड, राम मिश्रा, संजय पुरवार यांना ईश्वरचिठ्ठीने नगरपालिकेत पोहोचविले.
स्थानिक नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेतील सत्ताकारणाला गती मिळाली. १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी अपर्णा फुंडकर होत्या, तर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती. उपाध्यक्षपदासाठी भाजपतर्फे संतोष पुरोहित यांनी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) यांच्यावतीने तहसिन शाह यांनी उमेदवारी दाखल केली. नियमानुसार या पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत संतोष पुरोहित यांना एकूण ३० मते प्राप्त झाली, तर तहसिन शाह यांना केवळ ६ मते मिळाली. यानंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. यात तौलानिक संख्याबळानुसार चार स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार होती. तथापि भाजपच्या २९ अधिक १ या संख्याबळानुसार ३ स्वीकृत नगरसेवक सहज नियुक्त आले. तर चौथ्या स्वीकृत नगरसेवकासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) आणि भाजप या तिन्ही पक्षांचे तौलानिक संख्याबळ (३३.३३) समान असल्याने नियमाप्रमाणे चिठ्ठी काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अप) कडून किशोर भोसले यांचे नाव पाठविण्यात आल्याने तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. ईश्वर चिठ्ठीने संजय पुरवार यांची वर्णी लागली.
भाजपने एक हाती सत्ता मिळविल्याने तीन सदस्य स्वीकृत म्हणून सभागृहात जाणार होते. तर भाजपाकडे उरलेली सदस्यसंख्या आणि विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून समान गुण झाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. ईश्वर चिठ्ठी भाजपाकडूनच निघाली. सलग पाच वेळा विजयी ठरलेले नगरसेवक संजय पुरवार यांना यावेळी निवडणूक रिंगणातून थांबावे लागले. मात्र राजकारणातील नशिबाने पुन्हा एकदा त्यांना साथ दिली असून, सहाव्यांदा स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेत प्रवेश करण्याचा योग त्यांना लाभला. चौथ्या जागेसाठी ईश्वरचिठ्ठीचाच निर्णय घेण्यात आला. तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व काँग्रेसकडून किशोर भोसले यांच्या स्वतंत्र दोन चिठ्ठ्या होत्या, तर भाजपकडून संजय पुरवार यांची एकमेव चिठ्ठी होती. ईश्वरचिठ्ठी उघडण्यात आल्यानंतर पुरवार यांचे नाव आले.



