धाडच्या जि.प.उर्दू शाळेत ‘आनंद मेळावा’ उत्साहात

धाड, (प्रतिनिधी) : स्थानिक आयएसओ मानांकित असलेल्या जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत आज १४ जानेवारी २०२६ रोजी ‘फुड फेस्टिव्हल’ म्हणजेच आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराचे धडे गिरवत खाद्यपदार्थांच्या विक्रीचा मनसोक्त आनंद लुटला.

आनंद मेळाव्याचे उद्घाटन धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस अंमलदार चव्हाण यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शालेय प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांची कल्पकता आणि कष्ट बघून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर तब्बल १११ स्टॉल्स लावून खाद्यपदार्थांची मेजवानी दिली. निवडक विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी व निमंत्रित महिलांनी मोठ्या उत्साहाने मनसोक्त खरेदी केली. प्रत्येक स्टॉलवर झालेली चिमुकल्यांची गर्दी आणि त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारातील नफा-तोटा समजून घेणे, परिश्रमाचे महत्त्व ओळखणे आणि हिशोब व संवाद कौशल्य विकसित करणे, हा या आनंद मेळाव्यामागील उद्देश होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आजम खान आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सय्यद अलीम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!