क्राईम जगत
मलकापूर पोलिसांची अवैध बायोडिझेलवर धडक कारवाई
राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री मारला छापा; गुजरात पासिंगचे टँकर ताब्यात

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध बायो डिझेलचा महापूर वाहून नेणाऱ्या इंधन माफियांना मलकापूर शहर पोलिसांनी जोरदार दणका दिला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर १५ जानेवारीच्या पहाटे टँकरसह बायोडिझेलचा साठा ताब्यात घेऊन जिल्हाप्रशासनाचा बायोडिझेल बंदीचा दावा फोल ठरवला. या कारवाईमुळे मलकापूर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून १५ जानेवारीच्या पहाटे १.३० वाजताच्या सुमारास जीजे-१८-बीडब्लू-८३०७ क्रमांकाचे टँकर गुजरातवरून मुक्ताईनगरकडे मोठ्या प्रमाणात बायो डिझेल घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मलकापूर शहर पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी मलकापूर येथील राज्यमहार्गावर नाकाबंदी केली. त्यावेळी समोरून येणारे जीजे-१८-बीडब्लू-८३०७ क्रमांकाचे टँकर थांबवून झडती घेतली असता, सदर टँकरद्वारे अवैध बायोडिझेल वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात बायोडिझेल मिळून आले. या कारवाईमुळे परिसरातील इंधन माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अवैध बायोडिझेलचा साठा, वाहतूक परवाने तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून ट्रक चालकाची कसून चौकशी करण्यात येत असून या अवैध इंधन रॅकेटमागे नेमके कोण आहेत?, याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई एका टँकरपुरती मर्यादित नसून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध इंधन व्यापारावर कडक कारवाईचा इशारा असल्याची प्रतिक्रिया मलकापूर पोलिसांनी दिली. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि शासनाच्या महसुलावर घाला घालणाऱ्या माफियांविरोधात अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



