स्मार्ट बुलढाणा

बुलढाण्यात तरुणीचा मृत्यू: डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप

नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

बुलढाणा,(प्रतिनिधी): मोताळा तालुक्यातील गोतमारा येथील १८ वर्षीय तरुणीला काल रात्री बुलडाणा येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र,आज १५ जानेवारी रोजी तरुणीचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत तरुणीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे बुलढाणा शहरात चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

गोतमारा येथील शेजल सतीश मुरडिया (वय १८ वर्षे) या तरुणीचे गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईस्थित सेंट.जे.जे. हॉस्पिटलमध्ये ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान, १४ जानेवारी रोजी तिची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी तिला बुलडाणा शहरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ.निलेश वाघ यांच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. दरम्यान, तिच्यावर उपचार सुरू असताना आज १५ जानेवारीच्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. शेजलची प्रकृती सकाळपासून अत्यवस्थ झाली होती. डॉक्टरांच्या कानावर ही बाब घालून देखील डॉक्टर दुपारी १२ वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच शेजलचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही तिच्या नातेवाईकांनी यावेळी केला.
आम्ही कोणताच हलगर्जीपणा केला नाही
डॉ.निलेश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता, १४ जानेवारीच्या रात्री शेजलला बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणले होते. आम्ही रुग्णांची पूर्ण हिस्ट्री जाणून घेतली. त्याचवेळी तिची अवस्था गंभीर असल्याचे तिच्या नातेवाईकांना सांगितले होते. मात्र, आमची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने तिच्या आईने सांगितल्याने मी तिच्यावर पुरेपूर उपचार केले आणि गरज पडल्यास तिला उपचारासाठी इतरत्र नेऊ शकता,असेही सांगितले होते. परंतु, त्यांनी इथेच उपचार घेतले. उपचारादरम्यान आमच्याकडून कोणतीच हलगर्जी झाली नाही, डॉक्टर या नात्याने आम्ही पूर्ण प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलतांना दिली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!