अपघाताच्या घटनांसह अवैध धंदे रोखण्यासाठी प्रशासनाची समृद्धी महामार्गावर पाहणी

डोणगाव,(प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या अपघाताच्या घटना कशा रोखता येतील तसेच अवैध धंद्यांना लगाम कसा लावता येईल, यासाठी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी अधिकाऱ्यांसह बेलगाव ते पार्डा फाटा अशी ८७ किलोमीटर अंतरापर्यंत समृद्धी महामार्गावर पाहणी केली. १३ जानेवारी रोजी हा पाहणी दौरा झाला. समृद्धीवर काय काय सुधारणा करता येतील, याचा आढावा घेत समृद्धी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.
समृद्धी महामार्ग हा ज्या जिल्ह्यातून जाईल त्या जिल्ह्यात समृद्धी घेऊन येईल, असे वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून जिल्हा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. समृद्धीवरून होणारी अवैध रेती वाहतूक, दारू, गांजा विक्री, अवैध हॉटेल्सनी हा मार्ग चर्चेत आहे.
सर्वात जास्त अपघात बुलढाणा जिल्ह्यात व समृद्धीच्या इतिहासातील सर्वात मोठी सोन्याची लुटमार बुलढाणा जिल्ह्यातच झाली. अशा घटनांची गांभीर्याने दखल घेत १३ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार, मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके, स्थानिक ग्रामस्तरीय महसूल अधिकारी व कोतवालांनी ठिकठिकाणी पाहणी केली.

मेहकर तालुक्यामध्ये डोणगावजवळ बरेच अपघात झाले. यात अनेकांना जीव गमवावा लागला. यासाठी समृद्धी महामार्गावर इमर्जन्सी लेनवर उभी राहणारी वाहने कारणीभूत ठरली. असुविधा पाहता ही वाहने उभी राहतात. दारू, गांजा, अवैध हॉटेल्सदेखील कारणीभूत आहेत. यावरही कारवाई करण्याचे आदेश खांदे यांनी दिले. तसेच समृद्धीवरील वेगाला लगाम घालण्यासाठी स्पीड कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

खुश्कीचे मार्ग कायमचे बंद करा
चोर, दरोडेखोर, गुन्हेगार, तस्कर वापरत असलेले खुश्कीचे मार्ग बंद करण्यासाठी साइडपट्ट्या लावून मागच्या बाजूला जेसीबीने मोठा खड्डा करून वेल्डिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संरक्षक कुंपन आणि जाळ्या बसविण्याबाबत समृद्धी प्रशासनाला सुचित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!