स्मार्ट बुलढाणा

आश्चर्यम्! वाहतूक पोलिसाची सलग १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी नेमणूक?

अजय टप

मलकापूर,प्रतिनिधी : विदर्भाच्या प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेतील एक पोलीस कर्मचारी तब्बल १५ वर्षांपासून मलकापूर शहरातच कार्यरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित पोलीस अंमलदारांची तीन वेळा बदली झालेली असून ते प्रत्यक्षात मलकापूर शहरातच ‘रुळलेले’ असल्याचे दिसून येत आहे. यामागील नेमके गौडबंगाल काय?, हे अंमलदार नेमके कोणाचे खास आहे?, याचे उत्तर वरिष्ठ अधिकारी देतील काय?, असा प्रश्न कायदाप्रेमी नागरिक विचारत आहेत.

मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेत नेमणूकीस असलेल्या या पोलीस अंमलदार महाशयांचे कर्तव्य शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, अपघात रोखणे व नियमांची अंमलबजावणी करणे हे आहे. मात्र, शहरात मागील काही दिवसांत घडलेल्या छोट्या-मोठ्या घटनांचा आढावा घेतल्यास दिवसातून एकदा तरी वाहतूकीची कोंडी शहरात ठरलेली आहे. वाहनाधारकांकडून नियमभंग होत असल्याने अपघातांची मालीका देखील सुरुच आहे. विशेष म्हणजे संबंधित वाहतूक पोलीस वाहनांना शिस्त लावण्यासाठी रस्त्यांवर कमी आणि परिसरातील हॉटेल्स् आणि धाब्यांबरच जास्त नजरेस पडतात, ही सत्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यालगत छोटे व्यवसाय थाटणाऱ्या, तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी ऑटो किंवा ॲपेरिक्षा चालविणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार वाहनचालकांकडून ‘वसुली’साठी तर त्यांची नेमणूक करण्यात आली नाही ना?, तीन वेळा बदली होऊनही हे महाशय पुन्हा मलकापूर शहरातच कर्तव्य कसे काय बजाबत आहेत, त्यांचा बदली आदेश म्हणजे केवळ कागदोपत्री औपचारीकता तर नाही ना, बदली आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी का होत नाही? यामागे राजकीय दबाव, अधिकाऱ्यांचे समर्थन, किंवा आर्थिक साटेलोटे तर नाही ना?, असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

एकिकडे पोलीस अधीक्षक जिल्ह्याचा कारभार पारदर्शक करु पाहत आहे. तर दुसरीकडे मलकापूर शहरात उघडकीस आलेली ही बाब केवळ एका पोलीस अंमलदारापुरती मर्यादित नसून संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू पाहत आहे. त्यामुळे मलकापूरातील या “सावळ्या गोंधळा”ची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित वाहतूक पोलीस नेमके कोण आहेत? १५ वर्षे एकाच शहरात त्याना नेमणूक कशी देण्यात येत आहे? अवैध हप्ता वसुलीच्या सुरु असलेल्या चर्चेमध्ये काही तथ्य आहे का?, असेल तर त्यांना संरक्षण देणारे अधिकारी कोण?, याचा पोलीस विभागाने जाहीर खुलासा करावा, अशी जोरदार मागणी देखील मलकापूर शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व सजग घटकांकडून जोर धरत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!