स्मार्ट बुलढाणा

मोठी बातमी: बुलढाण्याच्या भरवस्तीत जाळली विषारी औषधे!

बुलढाणा,(प्रतिनिधी) : बुलढाणा शहराच्या मध्यवस्तीत कृषी केंद्र चालकाने रेसिडेन्शियल झोनमध्ये कृषी केंद्रातील मुदतबाह्य विषारी औषधे उघड्यावर जाळण्याचा प्रताप केला. या प्रतापामुळे परिसरात विषारी वायू पसरून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काहींना रुग्णालयात हलवावे लागले. याप्रकरणी नगरसेवक सचिन गायकवाड यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे भीषण दालमिया यांच्या पुत्रावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सोळंके ले-आउट, राजमाता चौक आणि वानखडे ले-आउट हा परिसर येतो. या परिसरात भीषण दालमिया यांच्या मालकीचे कृषी सेवा केंद्राचे गोदाम आहे. या गोडाऊनमधील बेकाम झालेली काही विषारी कीटकनाशके आणि अन्य साहित्य काल १७ जानेवारी रोजी भरवस्तीत जाळले. औषधांनी जसा पेट घेतला,तसेच त्याच्या ज्वलनातून निघालेला घातक आणि विषारी धूर क्षणात संपूर्ण परिसरात पसरला. त्यामुळे अबालवृद्धांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. तर काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
हा प्रकार लक्षात येताच नगरसेवक सचिन गायकवाड यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेत दोषी कृषी केंद्र धारकावर तातडीने दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी. बाधित झालेल्या नागरिकांचा वैद्यकीय खर्च दोषी व्यक्तीकडून वसूल करण्यात येऊन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी देखील गायकवाड यांनी केली आहे.
विनापरवानगी थाटले गोदाम?
रेसिडेन्शियल झोनमध्ये सुरू असलेल्या या गोदामासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसून विषारी औषधे उघड्यावर जाळणे हे नगर परिषद नियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. सोबतच व्यावसायिक फायद्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी खेळ मांडला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!