
छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने तरुण मुलीची हत्या केल्याची घटना २०२१ मध्ये घडली होती. याप्रकरणी सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत प्रेयसीचा गळा आवळून खून करणाऱ्या नराधम प्रियकराला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मूळचा गोरखपूर, उत्तर प्रदेश आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी परिसरात येणाऱ्या स्वराजनगर येथे वास्तव्यास असलेला भोलाकुमार कुजल मास्टर कुमार (वय २८ वर्षे) हा तक्रारदार राहुल बरखु राय यांच्या वडिलांसोबत काम करत होता. आणि त्यांच्याच घरात रहायचा. दरम्यान, त्याचे राहुलची बहीण इंदू (वय २२ वर्षे) हिच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. याच दरम्यान इंदूचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय भोलाकुमारच्या मनात आला. त्यामुळे संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद उद्भवू लागले. एकदा तर रागाच्या भरात भोलाकुमारने इंदूचा मोबाइल जाळून टाकला. त्यांच्यातील वाढते वाद पाहून राय कुटुंबाने भोलाकुमारला घर सोडून दुसरीकडे राहण्याचा सल्ला दिला.त्यामुळे तो स्वराजनगर भागात भाड्याने खोली घेऊन राहत होता.
दरम्यान, ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास इंदू कामावर जाण्यासाठी घरून निघाली, मात्र ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला असता, स्वराजनगरमधील एका मोकळ्या मैदानात इंदूचा मृतदेह बेवारस्थितीत पडलेला आढळून आला. तसेच तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे दिसून येत होते.
याप्रकरणी इंदूचा भाऊ राहुल याने बहिणीची हत्या करण्यात आली असून तिचा प्रियकर भोलाकुमारवर याच्यावर संशय असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी सदर बाब गांभीर्याने घेत तासपचक्रे फिरवली.भोलाकुमारला तपासकामी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या भोलकुमारला पोलिसांनी दांडुक्याचा प्रसाद देतच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयावरून आपणच इंदूला गाठले आणि रागाच्या भरात ओढणीने तिचा गळा आवळून तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. सोबतच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून मैदानात फेकून दिल्याचेही पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी बाजू मांडली. खटल्यादरम्यान एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये ३ प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी मोलाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने भोलाकुमारला दोषी ठरवत जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा आदेशात नमूद आहे.



