स्मार्ट बुलढाणा

राजूर घाटातील भीषण अपघात एक ठार

ट्रक चालकावर गुन्हा दाखल

अजय टप
मोताळा,(प्रतिनिधी): एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला समोरासमोर भीषण धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मोताळा तालुक्यात बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकी फाट्याजवळील राजूर घाटात ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील पवन अशोक पंडीत हा तरुण त्याच्या ताब्यातील पल्सर क्रमांक एमएच-२८-बीजे-८५४८ या दुचाकीने काही कामानिमित्त जात होता. राजूर घाटातील खडकी फाट्यासमोर पोहोचल्यानंतर समोरून येणाऱ्या केए-३६-ए-९१६७ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, धडक बसल्यानंतर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि पवन पंडीत याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत पवनचा जीव गेला होता.
या दुर्घटनेनंतर मृत पवनचे काका, गजानन तोताराम पंडीत (रा. कोलवड, ता. बुलढाणा) यांनी बोराखेडी पोलिसांत धाव घेऊन दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध वाहन निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून पवनच्या दुचाकीला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १०६ (१), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार बळीराम खंडागळे हे करीत आहेत. राजूर घाट हा वळणरस्त्यांचा आणि चढ-उताराचा मार्ग आहे. त्यामुळे या घाटात नेहमी अपघाताच्या घटना घडतात. वाहनचालक घाटात वेगमर्यादेचे पालन करत नसल्याने अपघातात निष्पाप नागरिकांचा जीव जातो. त्यामुळे या घाटात सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात,अशी मागणी होत आहे. पवनच्या अकाली निधनामुळे कोलवड गावावर शोककळा पसरली आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!