क्राईम जगत
धक्कादायक: राजू पवारच्या गुप्तांगावर वार करणार निघाली महिला
माजी सपरपंच पुत्राच्या हत्येचे गूढ उकलले; शरीरसुखाच्या मागणीतून केली हत्या

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : माजी सरपंच पुत्र राजू रामचंद्र पवार (वय ४५ वर्षे ) यांची अज्ञात आरोपींनी डोक्यात, तसेच गुप्तांगावर धारदार शस्त्राचे वार करून क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना १३ जानेवारी रोजी जामडी (फॉरेस्ट) ता. कन्नड परिसरात घडली होती. या बहुचर्चित खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या हत्येप्रकरणी वंदना पवार नामक गावातील महिला आणि तिच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. वारंवार शरीरसुखाच्या मागणीला कंटाळल्याने ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

जामडी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजू पवार १३ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता दरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. बराच वेळ उलटूनही पवार घरी परत पोहोचले नाही. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली असता, दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान शेतालगत असलेल्या वनविभागाच्या गट क्रमांक ९५ मध्ये राजू पवार यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळून आला. मारेकऱ्यांनी त्यांची केवळ हत्याच केली नाही, तर त्यांच्या शरीराची घोर विटंबना करत कमरेखाली आणि गुप्तांगावर वर्मी घाव घातल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहायक पोलीस निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर येथील श्वानपथक, ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावर बाईकने निरीक्षण करून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला होता.
गावात बंजारा भाषेची अडचण असल्याने पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी या भाषेची जाण असणाऱ्या व्यक्तींची गुप्तपणे नेमणूक केली. यातूनच वंदना पवार हिचे नाव समोर आले. पोलिसांनी वंदनाला ताब्यात घेत पोलीसी खाक्या दाखवला असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. राजू पवार वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून त्याला शेतातील झाडीत भेटायला बोलावले. राजू कपडे काढत असतानाच, दबा धरून बसलेल्या तिच्या मुलाने त्याच्या डोक्यात वार केला. त्यानंतर महिलेने त्याच्या गुप्तांगावर वार करून त्याची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी राजूचा मोबाइल, चपला आणि अंतर्वस्त्रे वेगवेगळ्या ठिकाणी फेकली. ‘दृश्यम’ चित्रपट आणि ‘क्राइम पेट्रोल’ मालिका पाहून या गुन्ह्याला अंजाम दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे या गंभीर आणि तितकाच किचकट असलेल्या गुन्ह्याची उकल झाली.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयसिंह राजपूत, पवन इंगळे, सुधीर मोटे आणि स्थानिक पोलिसांनी ही कामगिरी बजावली.



