स्मार्ट बुलढाणा

ब्रेक फेल झाल्याने एसटी बस खड्ड्यात

चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ४० प्रवाशांचे प्राण; काही प्रवासी किरकोळ जखमी

बुलढाणा,(प्रतिनिधी): भंगार बसेस म्हणजे बुलढाणा आगार, ही बाब काही नवीन नाही. या आगाराच्या एका एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना आज २२ जानेवारीच्या सायंकाळी वरुड येथील शरद पवार विद्यालयासमोर घडली. बस गावाच्या दिशेने जात असताना ब्रेक निकामी झाले. मात्र, चालक नंदू रामचंद्र शिंपणे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ४० प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे मोठी जीवितहानी टळली.

बुलढाणा आगाराची बस क्रमांक एमएच-२०-बीएल-१८०६ ही धाड, वरुड, सोयगाव, जामठी मार्गे बुलढाणा फेरी घेऊन जात होती. बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होते. चालक नंदू रामचंद्र शिंपणे (वय ५० वर्षे) रा. देऊळघाट यांच्यावर, तर वाहक म्हणून रेखा सोनूने या कार्यरत होत्या. ही बस वरूड गावाच्या जवळ जात असताना अचानक तिचे ब्रेक निकामी झाले. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून गाव अवघ्या ३०० मीटर अंतरावर होते. वरुड गावात रस्त्यावर मोठी गर्दी असते. जर अनियंत्रित बस गावात शिरली असती तर ५० हून अधिक नागरिक चिरडले जाण्याची भीती होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक शिंपणे यांनी गाडी वस्तीकडे न नेता रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उतरवली. बस शेतात गेल्याने तिचा वेग मंदावला आणि ती जागेवर थांबली. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ मार लागला असून सुदैवाने कोणाचाही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर लगतच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढून उपचारकामी धाड येथील रुग्णालयात रवाना केले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!