
मोताळा,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील चोऱ्यांच्या घटना थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कुठे वाहनांची चोरी,तर कुठे जनावरांची चोरी, विशेष म्हणजे देवालयातील दानपेट्या देखील सुरक्षित नसल्याची घटना देखील समोर आली आहे. तर इकडे मोताळा तालुक्यातील लिहा शिवारातून एका शेतकऱ्याच्या शेतातील शेडमधून अज्ञात चोरट्याने सव्वा लाख किमतीच्या २० शेळ्या लंपास करून धामणगाव बढे पोलिसांना थेट आव्हान दिल्याची घटना २२ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी अज्ञात चोरट्यााविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
लिहा येथील शेतकरी शिवदयाल नंदलाल जैस्वाल यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांची पिंपळगाव देवी ते मलकापूर रोडवर गट नंबर २०३ मध्ये शेत आहे. त्यांनी शेतात तारेचे कपांऊंड करून त्यामध्ये ३१ शेळ्या बांधलेल्या होत्या. दरम्यान, २१ जानेवारीच्या रात्री १० ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील तारेचे कपांऊंड वाकवित आत प्रवेश केला. यावेळी ६ हजार रुपये किमतीची, एक अशा १ लाख २० हजाराच्या २० बकऱ्या चोरल्याच्या फिर्यादीवरुन धामणगाव बढे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्ववे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ.राजेंद्र राणे हे करीत आहे. या घटनेमुळे परिसरात शेळ्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांना पकडण्याची मागणी होत आहे.



