“एलसीबी”ची धडाकेबाज कामगिरी 

बुलढाणा,(प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेती साहित्यावर डल्ला मारून जिल्ह्यात उच्छाद मांडणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेनेच्या पथकाला यश आले. या धडक कारवाईत पथकाने दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून जिल्ह्यातील तब्बल ४ चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच या चोरट्यांच्या ताब्यातून  ८० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यात येणाऱ्या जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ३ डिसेंबर २०२५ रोजी महादेव किसन मोहरुत (वय २५ वर्षे) रा. धार यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी १४१ नग तांब्याचे स्प्रिंकलर नोझल (तोट्या) चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) आणि ३०४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
बुलढाणा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, निलेश राजपूत, राजेंद्र गडकर, विकास देशमुख यांच्यासह जानेफळ पोलीस स्टेशनचे सपोनि अजिनाथ मोरे, संतोष जाधव यांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या पथकाने सापळा रचून देवराज युवराज पवार (वय २२ वर्षे) रा.बीबी ह.मु. मोहना खुर्द ता.मेहकर आणि उमेश राजू पवार (वय २५ वर्षे), रा. मोहना खुर्द ता. मेहकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता,त्यांनी केवळ जानेफळच नव्हे, तर जिल्ह्यातील इतर भागांतही चोऱ्या केल्याची कबुली दिली. तसेच ८० हजार रुपये किमतीचे चोरी केलेले तांब्याचे स्प्रिंकलर नोझल पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मेहकर पोलिसांच्या अभिलाखावरील दोन, डोणगाव दोन, लोणार दोन आणि जानेफळ पोलिसांत दाखल असलेले दोन,असे ऐकून आठ गुन्हे उघडकीस असून उपरोक्त आरोपींना पुढील तपासासाठी जानेफळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!