
शेगाव, (प्रतिनिधी): आपल्या देशात शिक्षणाला “पवित्र मंदिर” आणि शिक्षकाला “मार्गदर्शक” मानतात. मात्र, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने एका १० वर्षीय विद्यार्थ्याला केवळ प्रश्नाचे उत्तर देता आले नाही, म्हणून लोखंडी स्केल पट्टीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, मारहाण करणाऱ्या त्या शिक्षकाविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत पवन नारायण इंगळे हा १० वर्षांचा मुलगा चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेत अध्यापन सुरू असताना पवनला शिक्षक रवींद्र भडंग यांनी एक प्रश्न विचारला. पवनला सदर प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने शिक्षक भडंग यांचा संयम सुटला. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी हातातील स्केल पट्टीने पवनला अमानुष मारहाण केली. मारहाणीमुळे पवनच्या अंगावर वळ उमटले असून त्याला दुखापत देखील झाली. पवनने घरी गेल्यानंतर सदर प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
पालकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून पीडित मुलाचा जबाब नोंदवून नोंदविला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाल्याने अशा क्रूर शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी आरोपी शिक्षक चिम यांच्याविरुद्ध यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), बाल न्याय अधिनियम २०१५ चे कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस अंमलदार धीरजकुमार देशमुख हे करीत आहेत.



