स्मार्ट बुलढाणा

एसटी आगारात:”स्वच्छ भारत अभियाना”चा धिंडवडा!

महिलांच्या लज्जेचा प्रश्न निर्माण होऊनही अधिकारी सुस्तच

बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्हा मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा बस स्थानकावर सध्या “स्वच्छ भारत अभियाना”चा अक्षरशः धिंडवडा काढल्या जात आहे. विकास कामांच्या नावाखाली गत आठवडाभरापासून येथील बस स्थानकावरील प्रसाधनगृह बंद करून ठेवण्यात आलेले आहे. महिला प्रवाशांना वाऱ्यावर सोडण्याचा एसटी महामंडळाचा हा “अजब कारभार” पाहता प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या आणि हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बस स्थानकावर प्रसाधनगृहाचे नूतनीकरण काम सुरू आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, हे काम सुरू करताना “पर्यायी व्यवस्था”  नावाचा काही प्रकार असतो, याचा विसर बहुदा बुलढाणा आगाराच्या अती-हुशार अधिकाऱ्यांना पडलेला दिसत आहे. त्यामुळे तासनतास बसची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांची प्रसाधनगृह बंद असल्यामुळे मोठी तारांबळ उडत आहे. संकोच आणि सुविधेचा अभावामुळे महिलांना नाहक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे देश हागणदारीमुक्त करण्याच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे जिल्हा मुख्यालयाच्या बस स्थानकावर पुरुष प्रवासी आणि खुद्द एसटीचे कर्मचारी उघड्यावर लघुशंका करताना दिसत आहेत. उघड्यावर चालणाऱ्या या प्रकारामुळे बस स्थानकावर वावरणाऱ्या महिलांच्या लज्जेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी प्रशासनाला याचं ना सोयर ना सुतक! या संदर्भात विचारणा केली असता, आगार प्रमुख नेहमीप्रमाणे हात झटकून बाजूला झाले.
कर्मचाऱ्यांच्या प्रसाधनगृहात प्रवाशांची सोय केल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात तिथे पोहोचण्यासाठी कोणताही मार्गदर्शक फलक किंवा साधी सूचनाही लावलेली नाही. बुलढाणा आगाराच्या साहेबांना महिलांच्या अडचणी समजण्यासाठी अजून किती आठवडे लागणार? की प्रवाशांनी आपली सोय स्वतःच करून घ्यावी, असा अलिखित नियम लागू झाला आहे? प्रशासनाने तात्काळ हालचाल करून स्पष्ट सूचना फलक लावावेत आणि महिलांसाठी तात्पुरत्या फिरत्या प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!