खामगाव (बुलढाणा): पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या पवन नारायण इंगळे या अवघ्या १० वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षक रवींद्र चीम याच्यावर २४ जानेवारी पिंपळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. आता शिक्षण विभागाने देखील सदर घटनेची गंभीर दखल घेतली असून प्रशासकीय पातळीवरही त्यांच्यावर कारवाईसाठी समिती गठित केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची टांगती तलवार आहे.
पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत नेहमीप्रमाणे वर्ग भरलेला होता. वर्गातील पवन नामक विद्यार्थ्याला शिक्षक रवींद्र चीम यांनी गणिताचा प्रश्न विचारला. विद्यार्थी सदर प्रश्नाच उत्तर देऊ न शकल्याने शिक्षक रवींद्र चीम यांचा संयम सुटला आणि त्यांनी विद्यार्थी पवन इंगळे याला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, विद्यार्थ्याच्या शरीरावर गंभीर वळ उमटले असून त्याला मानसिक धक्काही बसला. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांवर या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. पालकांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव राजा पोलिसांत गुन्हा देखणी दखल झाला.
जिल्हा परिषद बुलढाणा येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये गायकवाड, गटशिक्षणाधिकारी (पं.स. खामगाव) यांची अध्यक्ष, डॉ. हाफीजा जमाल, (वैद्यकीय अधिकारी), एम.आर. धुरंधर (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) यांची सदस्य तर गजेंद्र पवार (केंद्रप्रमुख) यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली असून या समितीला
दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत. समितीने तत्काळ घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी करावी. या चौकशीचा संपूर्ण अहवाल आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या प्राथमिक कारवाईचा अहवाल दोन दिवसांच्या आत कार्यालयास सादर करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद आहे.
शिक्षकांवर कडक कारवाईचे संकेत
विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे शिक्षण क्षेत्रातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित शिक्षकावर आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता शिक्षण विभागाच्या चौकशी अहवालानंतर त्यांचे निलंबन किंवा इतर विभागीय कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.