स्मार्ट बुलढाणा

मलकापूर हादरले: लोणवडीत ५५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज २५ जानेवारी रोजी मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथे घडली. या घटनेमुळे लोणवडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
लोणवडी (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेले भागवत सोपान सुरडकर (वय ५५ वर्षे), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भागवत सुरडकर यांनी आज, रविवार  २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेतला. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे चुलत भाऊ संजय बहादूर सुरडकर यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने त्यांना खाली काढून तात्काळ मलकापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपस्थित डॉ.एस.पी. फेगडे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला.
उप जिल्हा रुग्णालयाच्या कक्षसेवक अल्का काळे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या डॉ.एस.पी.फेगडे यांच्या सहीच्या लेखी मेमोवरुण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारधी आणि पोलीस अंमलदार चिमकर हे करत आहेत. सुरडकर यांनी आत्महत्या का केली?, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!