स्मार्ट बुलढाणा
विक्रमी कमाई! शालेय सहलींतून एसटीच्या बुलढाणा विभागाचा गल्ला कोट्यवधींच्या घरात
मलकापूर आगार ठरले अव्वल

बुलढाणा (प्रतिनिधी): गावखेड्यातील मुलांना शहरापर्यंत नेऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करणारी आणि राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “लाल परी”ने कात टाकली असून शालेय सहलींच्या माध्यमातून आपली आर्थिक स्थिती भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाने गेल्या महिनाभरात शालेय सहलींच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७१ लाख ९० हजार ३४२ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. शासनाचे धोरण आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यामुळे जिल्ह्याच्या एसटी उत्पन्नात मोठी भर पडली असून यामध्ये मलकापूर आगाराने प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे.
हिवाळ्याच्या दिवसात विविध शाळांमार्फत सहलीचे आयोजन करण्यात येते. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध शाळांच्या १५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी एसटी बसने सहलीचा आनंद लुटला. या विद्यार्थ्यांनी एकूण ३८ हजार ६१० किलोमीटरचा प्रवास करत ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या. त्यामुळे एसटीच्या चाकांना मोठ्या प्रमाणात वेग मिळाला असून यामाध्यमातून एसटीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे.
शालेय सहलींसाठी खासगी बसऐवजी एसटी महामंडळाच्या बसनेच प्रवास करणे शासनाने बंधनकारक केल्याने सुरक्षित प्रवासासोबतच एसटीला खात्रीशीर ग्राहक मिळाला असून शालेय विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जात असल्याने ही सवलत विद्यार्थ्यांच्या फायद्याची ठरत आहेत. तर सामूहिक बुकिंगमुळे एसटीच्या तिजोरीतही एक कोटी ७१ लाख रुपयांची भर पडली आहे. यातील ५० टक्के रक्कम रोख स्वरूपात महामंडळाला मिळाल्याने दैनंदिन कामकाजाला मोठा आर्थिक आधार मिळाला असून उर्वरित रकमेची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येत आहे.
मलकापूर आगार अव्वल
बुलढाणा विभागातील सर्व आगारांपैकी मलकापूर आगाराने सर्वाधिक उत्पन्न मिळवत विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देवदर्शन आणि शैक्षणिक पर्यटनासाठी या भागातील शाळांनी एसटीला मोठ्या प्रमाणावर पसंती दाखवल्याचे दिसून आले आहे.
आता लक्ष लग्नसोहळ्यांवर!
शालेय सहलींचा हंगाम संपत असतानाच आता एसटी प्रशासनाने आगामी लग्नसोहळ्यांच्या हंगामावर लक्ष केंद्रित केले आहे. शालेय सहलींप्रमाणेच लग्न समारंभासाठी देखील “एसटी”ला पसंती द्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाकडून करण्यात आले आहे.



