क्राईम जगत

मलकापूरात प्राणघातक हल्ला: लग्नात नाचण्याच्या वादातून दोघांकडून “फायटर”ने मारहाण

मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निपाणा येथे एका तरुणावर आणि त्याच्या चुलत भावावर दोघांनी “फायटर”ने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. लग्नसमारंभात नाचण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या निपाणा येथे लग्न समारंभ होता. चुलत भावाचे लग्न असल्याने मुंबई येथील भाजीपाला विक्रेते दयानंद महानंद थाटे (वय २२ वर्षे) लग्नासाठी निपाणा येथे आले होते. २५ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास लग्नात आनंदात नाचण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी आरोपी तेजराव दादाराव इंगळे हा दारूच्या नशेत महिलांच्या घोळक्यात नाचत गेला. फिर्यादीचे काका भास्कर थाटे यांनी त्याला समजावून सांगत, “स्त्रियांमध्ये का नाचतोस? पुरुषांमध्ये जाऊन नाच,” असे म्हटले. याच रागातून आरोपी तेजराव याने काकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद सोडवण्यासाठी दयानंद थाटे मध्यस्थी करायला गेले असता, दुसरा आरोपी कृष्णा दादाराव इंगळे याने मागून येत काहीही न बोलता दयानंद यांच्या डोळ्यावर “फायटर” या लोखंडी शस्त्राने जोरदार वार केला. इतकेच नव्हे तर आरोपीने त्यांच्या छातीवर चावा घेत आनंदाच्या या क्षणावर विरजण पाडले. जोरदार झालेल्या वारामुळे दयानंद यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यांचा आवाज ऐकून मदतीला धावून आलेले राहुल आणि सुनील थाटे यांनाही आरोपींनी मारहाण केली. तेजरावने राहुल यांना लाथाबुक्क्यांनी, तर कृष्णाने पुन्हा ” फायटर”ने राहुलच्या डोक्यात आणि हातावर प्रहार केले. तसेच सर्वांना जीवने मारून टाकू अशी धमकी देत लग्नसमारंभात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या प्रकरणी दयानंद थाटे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा भारतीय न्याय संहिताचे कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२) (३), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पारधी हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!