स्मार्ट बुलढाणा
बिग भ्रष्टाचार न्यूज: दोन सरपंचांसह तीन सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल
ग्रामपंचायत अभिलेखांत केले होते फेरफार;मेहकर तालुक्यातील घटना

अजय टप
बुलढाणा,(प्रतिनिधी): सरपंचांना हाताशी धरून शासकीय अभिलेखात जाणीवपूर्वक खोडाखोड, फेरफार आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी मोहना बुद्रूक येथील तत्कालीन तीन ग्रामसेवक आणि दोन सरपंचांविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताकदिनी ही कारवाई झाल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रूक येथील “नमुना ८” मध्ये घरमालकाच्या रकान्यात “सरकार अतिक्रमण” असे लिहून मोठ्या प्रमाणावर खोडाखोड करण्यात आली होती. तसेच गट नं. १५० मधील शासकीय जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करून ती जमीन तत्कालीन प्रभारी सरपंच सुरेश आडे यांच्या नावे दाखवण्यात आली. ही जमीन पुढे एका खाजगी कंपनीला (जिओ) भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आणि आर्थिक लाभ लाटल्याचा ठपका केलेल्या तक्रारीतून आरोपी तत्कालीन सचिव विष्णू आर.आंधळे, उमेश नारायण शेवाळे, योगेंद्र जी. बचाटे, तत्कालीन सरपंच सुरेश जानकीराम आडे आणि विद्यमान सरपंच अंजली सुनील राठोड यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हास्तरीय चौकशी समितीने प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, सन २०१६-१७ पासून अभिलेखात फेरफार झाल्याचे निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे, या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थ वैभव करे आणि गणेश चव्हाण यांनी वारंवार उपोषणे केली होती. कारवाई होत नसल्याने संतापलेल्या आंदोलकाने आज, २६ जानेवारी २०२६ रोजी बुलढाणा येथील टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. प्रशासनाची धावपळ उडाल्यानंतर अखेर विस्तार अधिकारी शिवाजी शेषराव गवई यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन सचिव विष्णू आर.आंधळे, उमेश नारायण शेवाळे, योगेंद्र जी. बचाटे, तत्कालीन सरपंच सुरेश जानकीराम आडे आणि विद्यमान सरपंच अंजली सुनील राठोड यांच्याविरुद्ध मेहकर पोलिसांनी कलम १६७, ४३०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव हे करीत आहेत.



