स्मार्ट बुलढाणा
धाड पोलिसांच्या शिबिरात १५१ दात्यांचे रक्तदान
प्रजासत्ताकदिनी पार पडले भव्य रक्तदान शिबिर

धाड,(प्रतिनिधी): बुलढाणा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात धाड पोलीस आणि पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आज २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १५१ दात्यांनी रक्तदान केले.

प्रजासत्ताक दिनी केवळ ध्वजारोहण करून न थांबता, समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी धाड पोलीस स्टेशन आणि पोलीस पाटील संघटनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर तायडे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तय्यबअली खान यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सकाळी १० वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक तथा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल विसपुते, धाडच्या सरपंच सावित्रीबाई बोर्डे, पोलीस पाटील नंदाताई प्रमोद बोर्डे, चांडोळचे उपसरपंच शिवाजी अण्णासाहेब देशमुख, भाजपचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य किरण सरोदे, गणेश सरोदे, राजू पाटील नागवे, सुरेश जट्टे, पत्रकार दीपक माळवे, पत्रकार इम्रान खान यांच्यासह पोलीस अंमलदार आणि परिसरातील पोलीस पाटलांची उपस्थिती होती. यावेळी धाड व परिसरातील तब्बल १५१ दात्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिला.
शिबिराच्या यशस्वितेसाठी ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, तसेच पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी,सदस्य, सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.



