
खामगाव, (प्रतिनिधी): खामगाव शहरालगत असलेल्या वाडी परिसरात चार सशस्त्र दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरमालक आणि त्यांच्या मुलाने दरोडेखोरांना निकराचा प्रतिकार केला. प्रतिकारामुळे संतप्त झालेल्या चोरांनी या बाप-लेकावर चाकूने तब्बल १२ ते १४ वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मनोज अग्रवाल आणि मयंक अग्रवाल हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

खामगाव शहरात वाडी नावाचा परिसर आहे. सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली असताना २६ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी या परिसरात राहणारे मनोज अग्रवाल यांच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. घराचे कुलूप तोडून अग्रवाल यांच्या घरात शिरण्याच्या तयारीत असलेल्या या चोरट्यांचा हालचाली अग्रवाल कुटुंबीयांच्या लक्षात आल्या. त्यामुळे मनोज अग्रवाल, त्यांचा मुलगा मयंक अग्रवाल यांनी छातीला माती लावून दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत हिंसक झालेल्या दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी बाप-लेकावर जोरदार हल्ला चढवला. मनोज आणि मयंक यांच्यावर चाकूचे एकामागून एक तब्बल १२ ते १४ वार केले. या हल्ल्यात मनोज आणि मयंक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीने खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्रवाल पिता-पुत्रांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत असले तरी, त्यांच्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.

सीसीटीव्ही दरोडेखोर कैद
घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये चारही संशयित दरोडेखोर कैद झाले असून या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पोलीस पथके रवाना
दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांनी विविध पथके गठित केली असून ही पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने देखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.



