स्मार्ट बुलढाणा

दिनविशेष: कोण आहेत सुमन हेमादी?

सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी ढाका (आता बांगलादेशात ) येथे सुमन हेमादी म्हणून झाला. सुमन कल्याणपूर यांना ‘पसंत आहे मुलगी’ (१९५६) चित्रपटातून मराठी पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली. चित्रपट संगीतात येण्यापूर्वी सुमन कल्याणपूर या पंडित नवरंग नागपूरकर, खाँसाहेब अब्दुल रेहमान खाँ तसेच संगीतकार यशवंत देव यांच्याकडे संगीत शिकत. सुमन कल्याणपूर म्हटलं की त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वात जणू उतरलं असं दिसतं. निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज. आणि अनेक लोकप्रिय गाणी.‘जिथे सागरा धरणी मिळते’ असं म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, ‘घाल घाल पिंगा वार्यार माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात’, असं म्हणणारी सासुरवाशीण, ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही’ हे अंगाई गीत, ‘कशी गवळण राधा बावरली’ ही गवळण, ‘सांज आली दुरातुनी, क्षितिजाच्या गंधातुनी’ हे विरहगीत, ‘नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’ हे भावगीत, ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’, ‘देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा’ सारखी भक्तीगीते, ‘उठा उठा चिऊताई’, ‘या लाडक्या मुलांनो या’ सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. सुखाची सावली आणि वावटळ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देण्यात आला. तसंच त्यांना राज्य शासनाच्या वतीने ‘लता मंगेशकर पुरस्कारा’ने गौरविण्यात आलं आहे. सुमन कल्याणपूर यांना २०२३ साली भारत सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन कल्याणपूर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी आणि ओडिया भाषेतसुद्धा गाणी गायली आहेत. एकूण १३ भाषांमध्ये त्यांनी ३५०० गाणी गायली आहेत. आज त्यांच्या ८८ व्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!