क्राईम जगत
नांदुरा: कर्तव्य बजावत असलेल्या ठाण्यातच “पीएसआय” बनले आरोपी
तक्रारकर्त्यास मारहाण केल्याचे प्रकरण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल

अजय टप
नांदुरा,(प्रतिनिधी): नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला घाटोळ नामक पोलीस उपनिरीक्षक यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणी सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलीस दलातातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बाब गांभीर्याने घेतली असून या मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांच्या विरुद्ध त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदुरा खुर्द येथील रहिवासी असलेले गोपाळ राधेश्याम नालट (वय ३१ वर्षे) हे २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.४० वाजता दरम्यान वैयक्तिक तक्रार घेऊन नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांच्याशी नालट यांचा वाद झाला. तसेच पीएसआय घाटोळ यांनी नालट यांचा तक्रार अर्ज घेण्यास नकार देत, अर्ज फेकून दिला. या प्रकरणाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या घाटोळ यांनी नालट यांना चापटी-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप गोपाळ राधेश्याम नालट यांनी तक्रारीवरून केला असून या प्रकरणी नांदुरा पोलिसात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक घाटोळ हे नांदुरा पोलीस स्टेशन अधिकारी म्हणून नेमणुकीस असून त्याच ठाण्याच्या डायरीत त्यांची नोंद आता “आरोपी” म्हणून झाली आहे.



