क्राईम जगत
आंतरराज्यीय “बॅगलिफ्टर” एलसीबी”च्या जेरबंद
कर्नाटकातून आवळल्या मुसक्या;गुन्ह्यातील पाच लाख रुपयेही केले हस्तगत

बुलढाणा,(प्रतिनिधी): मुलीच्या शिक्षणासाठी बँकेतून काढून आणलेले ५ लाख रुपये कारची काच फोडून चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातून जेरबंद केले. करण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. नव्हेतर चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम देखील हस्तगत करण्यात आली आहे.
रिसोड (जि. वाशिम) येथील शेतकरी नितीन जिजेबा पऱ्हाड हे आपल्या मुलीच्या बीएएमएस प्रवेशाची फी भरण्यासाठी १६ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये आले होते. त्यांनी मेहेकर येथील एसबीआय शाखेतून ५ लाख रुपये काढले आणि आपल्या कारच्या डीक्कीत ठेऊन सदर कार कॉलेजच्या आवारात उभी करून ते कॉलेजमध्ये गेले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून त्यात ठेवलेली ५ लाख रुपयांची बॅग लंपास केली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. चोरटे आंतरराज्यीय “बॅग लिफ्टिंग” टोळीचे सदस्य असून कर्नाटकच्या शिवमोगा शहरात वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, गणेश पाटील, शेख चाँद, गोरले आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कर्नाटकात जाऊन पाच दिवस सलग शोध घेत मुख्य आरोपी सुनील ऊर्फ बालु रामु बोवी (वय ३२ वर्षे) रा. भद्रावती जि.शिवमोगा याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला भाऊ विष्णू रामु बोवी याच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये हस्तगत केले असून सदर गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत, हे विशेष! कष्टाचे पैसे परत मिळाल्याने शेतकरी कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले.



