
- अजय टप
- मलकापूर (प्रतिनिधी): एका भरधाव विना क्रमांकाच्या दुचाकीने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना मलकापूर ते दाताळा रोडवरील राजवीर पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी गवळी येथील शेतातून काम आटोपून रघुनाथ जानुजी मोहाळे हे आपल्या दुचाकीने क्रमांक एमएच-२८एआर-२९९४ वरून मलकापूरकडे परतत होते. ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास राजवीर पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या एका विना नंबर प्लेटच्या होन्डा युनिकॉन दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होता की, यामध्ये रघुनाथ मोहाळे यांना गंभीर दुखापत झाली. जखमी मोहाळे यांना उपचारासाठी रुग्णालय नेणे सोडून दुचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाला. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान, सेवानिवृत्त पोलीस अंमलदार भानुदास जानुजी मोहाळे (रा. यशोधाम, मलकापूर) यांनी २८ जानेवारी रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात युनिकॉन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (A), १२५ (B) सह मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४ आणि १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू टाकरखेडे हे करीत आहेत.



