क्राईम जगत

मोठी कारवाई: खुनाच्या गुन्ह्यातील “मोक्का”चा आरोपी अटक

दसरखेड एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनची सूत्रे हाती घेतल्यापासून धडाकेबाज कारवायांचा सिलसिला सुरू आहे. रेतीची सर्वात मोठी कारवाई, त्यानंतर रहस्यमय खुनाचा अल्पावधीतच उलगडा केल्याची घटना ताजी असतानाच त्यांनी आता गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यासह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई झालेला फरार आरोपी ऋषिकेश रामलाल इंगळे (वय २२ वर्षे) रा. महाकाली नगर, मलकापूर याला  पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अपराध क्रमांक १३८/२०२५ मधील ऋषिकेश इंगळे हा आरोपी होता. खुनासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर त्याच्यावर “मोक्का” अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, अटकेच्या भीतीने तो गेल्या तीन महिन्यांपासून फरार झाला होता. पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत होते. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून ही कारवाई ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ठाणेदार पेंदोर यांनी या पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. केवळ फरार आरोपींना पकडणेच नव्हे, तर अनेक अत्यंत गंभीर आणि किचकट गुन्हे त्यांनी आपल्या विशेष कार्यशैलीने उघडकीस आणले आहेत. परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडत त्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण करण्यात त्यांना मोठे यश आले असून या ताज्या कारवाईमुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!