दिनविशेष: सिनेअभिनेते रमेश देव यांचा जन्म

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापूर येथे झाला होता. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव ‘देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले.
रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्याबरोबर झाला व पडद्यावर आणि आयुष्यातही जोडी जमली. अभिनेते रमेश देव यांनी १९५१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पाटलाची पोर या चित्रपटात देव यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी १९५६ मध्ये राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९६२ मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या ‘आरती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी एक खलनायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी ३० मराठी नाटके, १९० हून अधिक मराठी व २८५ हून अधिक हिंदी चित्रपटांतून काम केले. त्यांनी नायक, खलनायक म्हणून कारकीर्द यशस्वी केली. ‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला देखणा खलनायक प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिला. ‘आनंद’ चित्रपटामधील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील त्यांची डॉक्टरची भूमिकाही खूप गाजली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन केले. आज त्यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.



