महाराष्ट्र माझा
“स्वराज्य रथ” सोहळ्याची पुण्यात जय्यत तयारी
१ फेब्रुवारीला महत्मत्वाच्या बैठकीचे आयोजन

पुणे: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा उत्साह आतापासूनच पुण्यात ओसंडून वाहताना दिसत आहे. आगामी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या शिवजयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्य रथ सोहळा समिती” सज्ज झाली असून सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंतीचे औचित्य साधून पुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ” स्वराज्य रथ सोहळा”चे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला “सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्य रथ” यंदाही विशेष सजावट आणि ऐतिहासिक जाज्वल्य वारसा जपत सहभागी होणार आहे. “स्वराज्य रथ सोहळा हा केवळ एक उत्सव नसून तो आपल्या गौरवशाली इतिहासाचे वंदन आहे. या रथाच्या माध्यमातून शिवकाळातील शौर्याचा इतिहास तरुण पिढीसमोर मांडण्याचा समितीचा मानस असून उत्सवाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध आणि भव्य करण्यासाठी समितीने सर्व कार्यकर्त्यांची आणि शिवप्रेमींच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणेस्थित शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये रथाची सजावट, मिरवणुकीचा मार्ग, सुरक्षेचे नियम आणि स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवण्यासाठी आणि नियोजनात मदत करण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्य रथ सोहळा समिती (पुणे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


