रस्ता सुरक्षा सप्ताह–२०२६ : मलकापूरात वाहतूक पोलिसांची मोटारसायकल रॅली

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी):रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मलकापूर शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह–२०२६ निमित्त भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
मलकापूर शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित या रॅलीला शहरातील प्रमुख चौकात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “वाहतूक नियम पाळा–सुरक्षित जीवन जगा” असा संदेश देत ही रॅली शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आली.
रॅलीदरम्यान दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, वेगमर्यादा पाळावी तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, अशा महत्त्वाच्या संदेशांचे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली.यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः हेल्मेट परिधान करून नागरिकांसमोर आदर्श ठेवला. नागरिकांनीही रॅलीकडे लक्ष देत या उपक्रमाचे स्वागत केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त रुजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



