क्राईम जगत
लोणार: तोतया पोलिसांकडून वृद्ध शेतकऱ्यास १.४८ लाखांचा चुना
वाहनधारक व प्रवाशांना लुटणारी टोळी पुन्हा सक्रिय

अजय टप
लोणार:लोणार-सुलतानपूर रोडवर एकेकाळी वाहन धारकांना लुटणारी तोतया पोलिसांनी टोळी सक्रिय होती. पोलिसांच्या कारवायांमुळे ही टोळी भूमिगत झाली होती. मात्र, या टोळीने पुन्हा आपले डोके वर काढले असून एका वृद्ध शेतकऱ्याला धाक दाखवत त्यांचे थोडे-थोडके नव्हेतर १ लाख ४८ हजार रुपयांनी लुटल्याची खळबळजनक घटना ३० जानेवारी रोजी समोर आहे. या भामट्यांनी वृद्ध शेतकऱ्यास “साहेबांच्या घरी मोठी चोरी झाली असून तुमचे दागिने काढून ठेवा,” अशी बतावणी करत त्यांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या.
लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील रहिवासी असलेले नारायण रंगराव तेजनकर (वय ७४ वर्षे) हे वृद्ध शेतकरी ३० जानेवारीच्या दुपारी ४ वाजता दरम्यान दुचाकीने लोणार-सुलतानपूर रोडवरून आपल्या घराकडे जाण्यास निघाले. त्यांची गाडी वडगाव तेजन शिवारात पोहोचताच दोन अज्ञात इसमांनी हाथ देऊन त्यांना वाटेत थांबवले. “आमच्या साहेबांच्या घरी खूप मोठी चोरी झाली आहे, पुढे चेकिंग सुरू आहे,” अशी बतावणी केली. एवढ्यावरच न थांबता या चोरट्यांनी तेजनकर यांना धाक दाखवत त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून एका कागदात गुंडाळल्याचा बहाणा करून त्यांच्या हातात दिल्या आणि चोरटे घटनास्थळावरून निघून पसार झाले. त्यानंतर तेजनकर यांनी कागद उघडून बघितला असता, त्यांना त्यामध्ये अंगठ्याऐवजी दगड दिसले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी त्यांनी लोणार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरडे हे करीत आहेत.



