क्राईम जगत

खळबळजनक: संविधानाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

"ॲट्रॉसिटी"सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भोटा (ता. नांदुरा) येथील तरुणाला भारतीय संविधानाबद्दल आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणं चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या प्रकरणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला म्हणून ॲट्रॉसिटी”सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवरून सोशल मीडियाचा वापर सध्या विधायक कामांपेक्षा जास्त समाजविघातक कृत्यांसाठी केला जात असल्याची प्रचिती आली आहे.
नांदुरा तालुक्यात येणाऱ्या भोटा येथील रहिवासी असलेला अमोल देवराम भोटकर (वय २४ वर्षे) हा ३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी इंस्टाग्रामवर पोस्ट पाहत होता. त्यावेळी त्याला गावातीलच भरत गजानन पारस्कर याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दोन प्रक्षोभक पोस्ट दिसल्या. सदर पोस्टमध्ये आरोपीने ” भारतीय संविधान पुन्हा नव्याने लिहिण्याची गरज आहे” आणि ” संविधानाच्या नावाखाली आंबेडकरवाद जबरदस्ती लादला जातोय, संविधान कोण्या बापाची जहागिरी नाही”, अशा आशयाचे आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला होता. तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या फोटोचा वापर करून संविधानाबद्दल अनुद्गार काढल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात आल्यानंतर अमोल भोटकर यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन आरोपी भरत पारस्कर याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने आपली चूक मान्य न करता जातीवाचक शिवीगाळ करत तुमच्याकडून काय होते ते करून घ्या, अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता घराच्या गच्चीवर जाऊन फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी अमोल देवराम भोटकर यांनी जलंब पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भरत गजानन पारस्कर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २९९, अनुसूचीत जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ (१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास खामगाव उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!