२४ तासांत पुन्हा तीन तरुणी बेपत्ता

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सुरू झालेले मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे सत्र काहिकेल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चिंतनीय चित्र आहे. गेल्या २४ तासांत जळगाव जामोद, बुलढाणा ग्रामीण आणि किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतून पुन्हा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुन्हा तीन तरुण मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातून ९ मुली आणि एका विवाहितेसह एकूण १० जण बेपत्ता झाले आहे, हे विशेष!
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या आता १० वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये ९ अल्पवयीन मुलगी, तरुण मुली आणि एका विवाहितेचा समावेश आहे. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस प्रशासनासमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले असतांनाच नव्याने तीन घटना उघडकीस आल्या आहेत.
यामध्ये किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सोनोशी (ता.सिंदखेड राजा) येथील रहिवासी असलेले लक्ष्मण पवार यांची १९ वर्षीय मुलगी आरती लक्ष्मण पवार ही तरुणी देखील १ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपूर्वी घरातून बेपत्ता झाली. तिचे आजोबा विष्णू शाहू पवार यांच्या यांनी या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसींग नोंदवली आहे. तिचा रंग निमगोरा रंग, उंची ५ फूट, चेहरा गोल असून तिने अंगात निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार विश्वास हे करीत आहेत.
बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरवंड येथील दिक्षा गजानन पवार (वय १८ वर्षे ४ महिने) ही तरुणी १ फेब्रुवारीच्या पहाटे ५ वाजेपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाली. तिचे वडील गजानन पवार यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे. दीक्षाचा रंग गोरा रंग, उंची ५ फूट, अंगात गुलाबी रंगाचा कुर्ता आणि काळी लेगीन घातलेली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार कैलास उगले हे करीत आहेत.
पिंपळगाव काळे (ता.जळगाव जामोद) येथील रहिवासी असलेली १८ वर्षीय स्नेहल देविदास कात्रे ही तरुणी १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. या प्रकरणी तिची आजी पुंजाबाई वाघमारे यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसींग दाखल केली असून स्नेहलचा रंग गव्हाळ रंग, उंची १६२ सेंमी, बांधा सडपातळ बांधा असून तिने अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित हे करीत आहेत. वरील वर्णनाच्या मुली, तरुणींबाबत काही माहिती मिळाल्यास संबंधित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर वाढीस लागलेल्या या घटनांमुळे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कमालीची गांभीर्यता घेतली असून उपरोक्त मुलींच्या शोधार्थ विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!