
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : मलकापूर शहरातील नवीन ईदगाह परिसरात फोटो काढण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका १७ वर्षीय युवकाला आरोपीने बेदम मारहाण केली. नव्हेतर त्यांच्यावर फायटरने हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर असून याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ वादातून मारहाणीच्या घटना वाढीस लागल्याने लोकांना कायद्याचा धाकच उरला नसल्याच्या प्रतिक्रिया कायदेप्रिय नागरिकांमधून उमटत आहे.
मलकापूर शहरातील अहमदशरपुर पारपेठ परिसरातील रहिवासी असलेला सैयद मोहीद मिर सैयद मुश्ताक (वय १७ वर्षे) हा १ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता दरम्यान त्याच्या मित्रांसोबत नवीन ईदगाह परिसरात फोटो काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी यातील आरोपी अर्शद खान उर्फ गुड्डू अब्दुल खान ठेकेदार (रा. मदारटेकडी, मलकापूर) हा सदर ठिकाणी गेला आणि या ठिकाणी फोटो का काढता?, असे म्हणत मोहिडसोबत वाद घातला आणि त्याला शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपी अर्शद खान याने त्याच्या हातातील फायटरने सैयद मोहीद याच्या मानेवर आणि डाव्या खांद्यावर वार करून मारहाण केली. तसेच त्याच्या कानाखाली बंदूक लावून “तुला एखाद्या दिवशी उडवून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली.
या प्रकरणी सैयद मोहीद मिर सैयद मुश्ताक याने मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अर्शद खान उर्फ गुड्डू अब्दुल खान ठेकेदार याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोकडे करीत आहेत.



