क्राईम जगत

बुलढाणा जिल्हा, एक काळरात्र आणि पोलीस तपासाचे चक्र

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जानेवारी संपला आणि फेब्रुवारी महिन्याची ती तिसरी तारीख उजाडली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या कणखर नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा नेहमीप्रमाणे सतर्क होती. पण, एकाच दिवसात समोर आलेल्या काही घटनांच्या मालिकेने खाकी वर्दीवरचा ताण अधिकच वाढवला होता. आत्महत्या, चोरी, फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचार, अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांनी जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले.
नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये दुपारच्या सुमारास संतोष वक्टे नावाचा एक शेतकरी धापा टाकत पोहोचला. त्याची भावजय ३२ वर्षीय वर्षा वक्टे ही घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. ती सततच्या आजारपणामुळे त्रस्त होती. शोधाशोध सुरू झाली आणि गावाबाहेरील एका सार्वजनिक विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळला. एका हसत्याखेळत्या कुटुंबावर आजारपणाने असा घाला घातला होता की, वर्षाने मृत्यूला कवटाळणे पसंत केले. पण ही तर केवळ सुरुवात होती.
कारण, बुलढाणा ग्रामीण आणि रायपूर परिसरातही मृत्यूने आपले जाळे पसरले होते. ७० वर्षांचे शेषराव तांगडे आणि ४२ वर्षांचे विजय मुरडकर या दोन शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. विजय तर आपल्या पत्नीला शेतात जातो, असे सांगून निघाले होते. पण, जेव्हा त्यांचा डबा घेऊन भाऊ शेतात पोहोचला, तेव्हा पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा मृत गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळुन आला. सर्वत्र हळहळ व्यक्त करणारे वातावरण नजरेस पडेल. नव्हे तर या घटनांनी ग्रामीण भागातील मानसिक नैराश्याचा एक गंभीर चेहरा समोर आला.
दुसरीकडे, देऊळगाव राजा परिसरात महसूल आणि पोलीस विभागाचे एक पथक गस्तीवर होते. पहाटेची वेळ होती. तहसीलदार मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कविता सिरसाट आणि त्यांचे पथक अवैध रेती उपशावर बारकाईने लक्ष ठेवून होते. इतक्यात सिनगाव जहागीर फाट्यावर एक विना नंबरचे पांढऱ्या रंगाचे टिप्पर संशयास्पदरीत्या येताना या पथकाला दिसले. पथकाने सदर टिप्पर थांबवले. तपासणीअंती त्यात ४ ब्रास अवैध रेती आढळली. अधिकाऱ्यांनी चालक लक्ष्मण पवार आणि गणेश नागरे यांना टिप्पर पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितले. पण, कायद्याची भीती उरली नसलेल्या रेती माफियाने टिप्पर वेगाने दामटत साठवलेली रेती भररस्त्यात सांडून घटनास्थळावरून पळ काढला. नव्हे तर सरकारी कामात अडथळा आणून या वाळू माफियांनी पथकाला खुले आव्हानच दिले.
शहरात एकीकडे शारीरिक गुन्हे घडत असताना, दुसरीकडे येळगाव परिसरात राहणाऱ्या इसमाच्या बँक खात्यावर भला मोठा “डिजिटल दरोडा” पडला. स्थानिक निधी लेखा विभागात कार्यरत असलेले भरत ओळेकर यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला. “मी एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलतोय, तुमचा प्रोटेक्शन प्लॅन बंद करायचा आहे,” असे सांगून आरोपीने ओळेकर यांचा विश्वास संपादन केला. काही मिनिटांतच त्यांच्या खात्यातून १ लाख ९६ हजार रुपये लंपास झाले. एका सुशिक्षित नोकरदारालाही सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढले होते. बुलढाणा सायबर पोलीस आता या अज्ञात आरोपीचा तांत्रिक माग काढत आहेत.
लोणार तालुक्यातील गुंधा गावात रक्ताची नातीच एकमेकांच्या जीवावर उठली. सुमन भाग्यवंत ही महिला आपल्या पतीसह शेतात पाईप बदलण्याचे काम करत असताना नात्याने दीर आणि सासरे लागणारे रामेश्वर आणि दौलत भाग्यवंत यांनी सदर ठिकाणी जाऊन “आमच्या शेतात का आली?”, यावरून जुना वाद उकरून काढला आणि दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. रागाच्या भरात आरोपींनी सुमनला आणि तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर महिलेचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिली. तर रात्रीची वेळ जवळ येत असतानाच नांदुरा रेल्वे स्टेशनवरून एक मेमो आला. लोको पायलटने माहिती दिली होती की, नांदुरा ते बीस्वा दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ना ओळख, ना पत्ता. पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा केवळ शरीराचे अवशेष उरले होते. तो कोण होता? त्याने हे पाऊल का उचलले? हे प्रश्न रेल्वेच्या रुळांखाली गाडले गेले होते. ३ फेब्रुवारीला गरिबी आणि आजारपणातून समोर आलेले नैराश्य, तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सायबर जगातील धोके, या घटना पाहता समाजमन ढवळून निघाले. पोलीस अधिकारी आता या प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पुराव्यांची साखळी जोडत असून या घटना घडूच नयेत, यासाठी शासन,प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!