क्राईम जगत
चोरट्या महिलांकडून दोन लाखांच्या सोन्याची लूट
देऊळगाव राजा ते देऊळगाव मही प्रवासातील घटना

आनंद इंगळे
सिंदखेड राजा, (प्रतिनिधी) : देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या पर्समधून दोन अनोळखी महिलांनी २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
देऊळगाव राजा शहरातील संजयनगर परिसरात राहणाऱ्या फैमीना बी सत्तार नुरमोहम्मद (वय ५५ वर्षे) ह्या ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.१५ वाजता बसने देऊळगाव राजा येथून चिखलीकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी दोन अनोळखी महिलांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. नव्हेतर देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान उपरोक्त संशयित महिलांनी फैमीना बी यांच्या पर्समधील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी अलगद चोरून पोबारा केला. त्यांच्या पर्समध्ये तीन तोळे वजनाची सोन्याची पोत (किंमत ७५ हजार रुपये), पाच तोळे वजनाची सोन्याची पुतळ्यांची माळ (किंमत १ लाख २५ रुपये), असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल होता. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच फैमीना बी यांनी देऊळगाव राजा पोलिसांत धाव घेऊन दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गु ह्याचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिंड हे करत आहेत.



