
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): मेहकर-सुलतानपूर रोडवरील दादुलगव्हाण फाटा येथे तहसीलदार निलेश मडके यांनी अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला. या कारवाईत वाळू आणि वाहनासह एकूण १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोहीम तीव्र केल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
लोणार-मेहकर रोडने एका टिप्परमधून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार निलेश मडके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मडके यांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी आपल्या पथकातील कोतवाल मुळे, बंडू मोरे, महसूल अधिकारी राखी देशमुख आणि वाहन चालक विशाल बावरे यांना सोबत घेऊन दादुलगव्हाण फाट्याजवळ सापळा लावला. त्यावेळी सायंकाळी ५.५० वाजेच्या सुमारास सुलतानपूरकडून येणारे एमएच-२८-बीबी-९६९७ क्रमांकाचे टिप्पर थांबवून त्याची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये २ ब्रास रेती आढळून आली. या वाळूच्या वाहतुकीसाठी चालक कैलास रामगीर गिरी याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना किंवा रॉयल्टीची पावती मिळून आली नाही. त्यामुळे पथकाने सदर टिप्पर जप्त केले असून या कारवाईत ३० हजार रुपये किमतीची २ ब्रास वाळू आणि १२ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर, असा एकूण १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी तहसीलदार निलेश मडके यांच्या फिर्यादीवरून चालक कैलास रामगीर गिरी आणि टिप्पर मालक पवण किसन जाधव (दोन्ही रा. इंदिरा नगर, मेहकर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३(२), ३(५) तसेच खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ च्या कलम २१(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई हे करीत आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.



