क्राईम जगत

साखरखेर्डा आणि डोणगावातून दोन महिला बेपत्ता

बेपत्ता होण्याचे सत्र जिल्ह्यात अविरत सुरू

अजय  टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातून तरुणी आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. अवघ्या २४ तासांत डोणगाव आणि साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पुन्हा दोन वेगवेगळ्या घटनांत दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून दररोज मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटना समोर येत आहेत. एकही दिवस असा उगवला नाही, ज्या दिवशी जिल्ह्यातील एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये मुलगी किंवा महिला बेपत्ता झाल्याची तक्रार गेली नाही, हे वास्तव आहे. दरम्यान, पुन्हा दोन नवीन घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत.
डोणगाव: पहिली घटना डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कनका (ता. मेहकर) येथे घडली आहे. सिताराम वसंत देवकर यांची २० वर्षीय मुलगी दिपाली सिताराम देवकर ही ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. तिचा रंग सावळा, उंची ४.५ फूट, लांब काळे केस आणि तिने अंगात पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असुन पायात गुलाबी सँडल घातलेली आहे. तसेच तिच्या उजव्या हातावर पायल, हे नाव गोंदलेले आहे. या प्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय घिके आणि आरीफ शेख हे करीत आहेत.
साखरखेर्डा : दुसरी घटना साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पोखरी फाटा येथे घडली. गागलगाव येथील रहिवासी गजानन प्रल्हाद म्हस्के हे आपली बहीण शिवकन्या विनोद सास्ते (वय ३८ वर्ष) हिची प्रकृती ठीक नसल्याने तिला माहेरी घेऊन जात होते. प्रवासादरम्यान पोखरी फाट्याजवळ बहिणीला चक्कर आल्याने गजानन यांनी गाडी थांबवून पाणी आणण्यासाठी गेले असता, बहीण गायब झाल्याचे दिसले. तिचा रंग गोरा, चेहरा गोल, उंची ५.५ फूट, बांधा मजबूत असून तिने गुलाबी साडी आणि लाल रंगाचे ब्लाउज परिधान केलेले आहे. तसेच्या तिच्या हातावर गजानन नाव गोंदलेले आहे. या प्रकरणी देखील मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार कडुबा डोईफोडे आणि रामदास वैराळ हे करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!