क्राईम जगत

क्राईम वॉच: विवाहितेचा विनयभंग तर मालमत्तेच्या वादातून हाणामारी

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात मागील २४ तासांत गंभीर गुन्ह्याच्या अनेक घटना समोर आल्या. महिलेचा विनयभंग, जमिनीच्या वादातून सख्ख्या भावावर हल्ला आणि घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा तामगाव पोलिसांनी केलेला पर्दाफाशच्या घटनेचा समावेश आहे.
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भिवगाव बुद्रूक रहिवासी असलेली पूनम बोरुडे (वय २५ वर्षे) ही महिला आपल्या घरासमोर भांडी घासत होती. त्यावेळी आरोपी भूषण वाकोडे याने सदर विवाहितेच्या घरात घुसून “तुझे काय वाकडे केले”, असे म्हणत तिच्या गालावर व कानावर चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा: बुलढाणा तालुक्यातील हतेडी बुद्रूक जमिनीची आणि घराची वाटणी मागण्यासाठी गेलेल्या सुभाष हिम्मतराव निकाळजे (वय ५४ वर्षे) यांना त्यांचेच भाऊ अरुण निकाळजे आणि भारती निकाळजे यांनी बेदम मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात आणि बरगडीवर काठीने वार केला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन काकडे हे करत आहेत.
तामगाव: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वकाना येथील शेतकरी बद्रीनारायण ठोंबरे यांची ९५ हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी १८ जानेवारी रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी तामगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत ईरशाद खान, शेख साजीद (दोन्ही रा. जळगाव जामोद) आणि मुख्य आरोपी शेख जाकीर (रा. हिवरखेड) या तिघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या ताब्यातून त्यांनी चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आल्याने अवघ्या काही दिवसातच उपरोक्त गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.
बुलढाणा: बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर
(धामणधरी) येथील प्रज्वल नितीन जाधव (वय २० वर्षे) या तरुणाने आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे. त्याने आत्महत्या का केली?, याचे कारण समजू शकले नाही.
संग्रामपूर: सोनाळा (ता.संग्रामपूर) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनी वसाडी येथे अनुराधा डुडवा यांच्या पतीला आरोपी किसना चंगळ, रामलाल डुडवा व इतर दोन साथीदारांनी काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी सोनाळा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. गुन्ह्यांची दिवसागणिक वाढती संख्या पाहता गुन्हेगारांना कायद्याचे भय उरले नसल्याचे दिसत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!