क्राईम जगत

बुलढाण्यातून पुन्हा चार जण बेपत्ता

तरुण-तरुणींसह विवाहिता गायब

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : गेल्या आठ दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली असून ही गंभीर आणि तेवढीच चिंताजनक बाब आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातून पुन्हा चार जण बेपत्ता झाल्याची बाब समोर आली असून त्यामध्ये तामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा पोलीस हद्दीचा समावेश आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्यांमध्ये दोन तरुण मुली, एक विवाहित महिला आणि एका तरुण मुलाचा समावेश आहे.

चिखली: चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्होळा येथील प्रिया रमेश जाधव (वय २१ वर्षे) ही ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिचा रंग सावळा आणि बांधा मजबूत आहे. प्रियाने हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तर शहरातील रोहिदास नगरमधील रहिवासी असलेली सुनिता अरुण घाडगे (वय ३५ वर्षे) ही ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून बेपत्ता आहेत. तिने गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे. या दोन्ही प्रकरणात हरवल्याची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात चिखली पोलीस करीत आहेत.

तामगाव: तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडगाव वान येथील रहिवासी असलेली गायत्री लक्ष्मण शिंदे (वय १८ वर्षे ४ महिने) ही ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वरवट बकाल येथे शाळेत जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र उशिरापर्यंत ती घरी न परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. या प्रकरणी प्रणव शिंदे यांनी तामगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. गायत्रीने अंगात नेव्ही ब्लू रंगाचा टॉप आणि काळी लेगीज घातलेली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दयाराम कुसुंबे हे करत आहेत.

देऊळगाव राजा: देऊळगाव राजा येथील कबाडपुरा भागातील रहिवासी असलेला शारीक खान शकिल खान (वय २१ वर्षे) हा तरुण ५ फेब्रुवारी रोजी त्याच्या मोठ्या भावाला पोस्टाच्या भरतीचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी जात आहे, असे सांगून एमएच-२०-एफएस-१६१६ क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलने घरातून बाहेर पडला. मात्र, तो कामावर पोहोचला नाही, आणि घरी देखील परतला नाही. याप्रकरणी शकिल खान यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार नारायण गिते हे करीत आहेत. उपरोक्त बेपत्ता संदर्भात काही माहिती मिळाल्यास संबंधित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!