क्राईम जगत
क्रूर हत्याकांड! १० लाखांच्या आमिषाने तरुणाचा खून
हात-पाय बांधून मृतदेह विहिरीत फेकला; पोलिसांनी २४ तासांत छडा लावून दोघांना ठोकल्या बेड्या

जालना,( प्रतिनिधी) : दहा लाखांच्या आमिषाने एका २० वर्षीय तरुणाची गळा आवळून क्रूर हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हात-पाय बांधून आणि पोटाला दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकून दिला. मात्र, मंठा (जि.जालना) पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवत घटनेच्या अवघ्या २४ तासांत या हत्याकांडाचा पर्दाफाश केला. नव्हेतर मुख्य आरोपीसह अन्य एकाला बेड्या ठोकल्या.
मंठा तालुक्यातील पेवा ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीमध्ये ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक अनोळखी मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते आणि पोटाला मोठा दगड बांधलेला होता. यावरून हा साधा अपघात नसून सुनियोजित खून असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते. त्यामुळे पेवा गावाच्या पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मृताच्या अंगावरील कपडे आणि तांत्रिक तपासावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यात पटवली. मृतक अथर्व गणेश लोखंडे (वय २० वर्षे, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे, पोलीस अंमलदार संतोष बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची गती वाढवली. गुप्त खबरी तसेच तांत्रिक माहिती काढून पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी किसन उर्फ कृष्णा राजाराम धोजे (वय ३५ वर्षे) रा. आडगाव तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच कृष्णाने खुनाची कबुली दिली. त्यामुळे अवघ्या २४ तासांत या बहुचर्चित हत्याकांडाचा उलगडा झाला.
असे दिले गुन्ह्याला अंजाम
आरोपी कृष्णाने अथर्वला १० लाख रुपये देण्याच्या बहाण्याने त्याच्या कारमध्ये बसवून पेवा (ता.मंठा) शिवारात आणले. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून आपल्या दोन सहकारी नातेवाईकांच्या मदतीने कारमध्येच अथर्वचा दोरीने गळा आवळून खून केला. एवढ्यावरच न थांबता मृतदेह कोणाला सापडू नये यासाठी त्यांनी त्याचे हात-पाय बांधले, त्याच्या पोटाला दगड बांधला आणि मृतदेह विहिरीच्या पाण्यात फेकून दिला.
कर्नाटकातून ठोकल्या बेड्या
गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी विविध ठिकाणी तातडीने पथके रवाना केली. मुख्य आरोपी कृष्णाचा दुसरा साथीदार कर्नाटक राज्यात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीचा माग काढून कर्नाटकातून त्याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे, पोलीस अंमलदार संतोष बनकर हे करत आहेत.



