
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव शहरातील माऊली नगर भागात एका प्रतिष्ठित सरकारी कर्मचाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करून चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना भरदिवसा सलामी दिली. विशेष म्हणजे घरासमोर उभी असलेली नवीन कोरी हुंडाई एक्सटर कार देखील लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मूळचे उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी असलेले आणि गेल्या दोन वर्षांपासून जिगाव प्रकल्प अंतर्गत इरिगेशन कार्यालय (खामगाव) येथे अकाउंटंट म्हणून कार्यरत असलेले धीरज कुमार रामपाल सिंग (वय ३५ वर्षे) हे शेगाव येथील माऊलीनगरमध्ये मुरलीधर शेगोकार यांच्या मालकीच्या घरात किरायाने राहतात. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास धीरज कुमार हे आपली पत्नी लाभिणी आणि मुलासह नागपूर येथे सासू-सासऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. नागपूरला जात असताना त्यांनी घराची चावी शेजारी राहणारे अनिल हातेकर यांच्याकडे सोपवली होती. तसेच त्यांच्या घरासमोर त्यांचे सासरे किशोर पाटील यांच्या मालकीची नवीन गडद निळ्या रंगाची हुंडाई एक्सटर कार क्रमांक एमएच-४९-सीएस-४९५६ उभी केलेली होती. धीरज कुमार ८ फेब्रुवारी रोजी नागपूरवरून घरी परत येणार होते. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी घरकामासाठी येणाऱ्या पल्लवी इंगळे हिला अनिल हातेकर यांच्याकडून चावी घेऊन घर साफसफाई करण्यास सांगून ठेवले होते. त्यामुळे सकाळी १० वाजता पल्लवी घरची साफसफाई करण्यासाठी पोहोचली असता, तिला घरासमोर नेहमी उभी राहणारी नवीन कार गायब दिसली. त्यामुळे तिने ही बाब तातडीने अनिल हातेकर यांना सांगितली. हातेकर आणि पल्लवी यांनी घराकडे जाऊन पाहिले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा आणि कुलूप तुटलेला दिसला. घरात चोरी झाल्याचा संशय येताच त्यांनी तात्काळ धीरज कुमार यांना फोनवरून माहिती दिली. धीरज कुमार सकाळी ११.३० च्या सुमारास शेगावला पोहोचले आणि घरात प्रवेश केला असता, त्यांना संपूर्ण घराची दाणादाण उडालेली, बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे दरवाजे तोडून सामान अस्ताव्यस्त फेकलेले, आणि कपाटात ठेवलेले हुंडाई एक्सटर कार (किंमत ६ रुपये), १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स (किंमत ६५ हजार रुपये) आणि बाहेर उभी असलेली कार, असा एकूण ६ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. धीरज कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) आणि ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव हे करीत आहेत.



